वरकुटे मलवडी : बनगरवाडी, ता. माण गावात कोरोनाचे रुग्ण वाढत चालले असून, मागील पंधरवड्यापासून बाधितांची संख्या ३२ पर्यंत पोहोचली आहेे. बाधितांचे प्रमाण वाढल्याने कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी बनगरवाडीतील आपत्ती व्यवस्थापन समितीने ठोस उपाययोजना करीत कडक पावले उचलली आहेत. तसेच कोरोनामुक्त गाव करण्यासाठी अंमलबजावणी सुरू केली आहे.
बनगरवाडी कोरोनामुक्त ठेवण्यासाठी गावात बैठक झाली. या बैठकीला म्हसवड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक बाजीराव ढेकळे, सदाशिव बनगर, ग्रामसेवक शिवयोगी वंजारी, पोलीसपाटील शहाजी बनगर, सुरेश बनगर, बापूराव बनगर, सचिन होनमाने, आबा बनगर, आरोग्य सेविका संगीता बनगर, सागर होनमाने आदी उपस्थित होते.
यावेळी प्रत्येक वॉर्डमधील ग्रामपंचायत सदस्याने आपत्ती व्यवस्थापन समितीबरोबर दररोज घरोघरी फिरून लोकांच्या प्रकृतीविषयी विचारपूस करणे बंधनकारक करण्यात आले आहे. नागरिकांना मास्कचा वापर करायला लावणे, कुटुंबातील सदस्यांत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रबोधन करणे याबाबत ठरविण्यात आले आहे. तसेच कोणाला काही लक्षणे दिसून आल्यास, त्यांची नावे पुळकोटी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास देऊन त्यांची तपासणी करण्यात येणार आहे. अशाप्रकारे कोरोनाला प्रतिबंध घातला जाणार आहे. यासाठी दारात येणाऱ्या आपत्ती व्यवस्थापन समितीच्या सदस्यांना, आरोग्य कोरोना दूतांना ग्रामस्थांनी योग्य ती माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहनही सरपंच रंजना बनगर, ग्रामसेवक, शिवयोगी वंजारी व पोलीसपाटील शहाजी बनगर यांनी केले आहे.
‘माझं गाव माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत कोरोनाला हद्दपार करण्यासाठी हा उपक्रम राबविला जाणार आहे. रात्रंदिवस बनगरवाडीतील ग्रामस्थांवर आपत्ती व्यवस्थापन समितीच्या सदस्यांचा फिरता वाॅचही राहणार आहे. शासनाच्या नियमांची कडक अंमलबजावणी करून कोरोनाचा प्रसार आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जाणार आहेत, असे ठरविण्यात आले.
कोट :
बनगरवाडी परिसरातील नागरिकांनी कसलीही भीती मनात न बाळगता कोरोना तपासणीसाठी स्वतःहून समोर आलं पाहिजे. जे ग्रामस्थ बाधित येतील, त्यांना शंभर टक्के तन, मन, धनाने मदत केली जाईल.
- शहाजी बनगर, पोलीसपाटील
फोटो ओळ :
बनगरवाडी, ता. माण येथील कोरोना बैठकीला सहायक पोलीस निरीक्षक बाजाराव ढेकळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. (छाया : सिध्दार्थ सरतापे)