म्हसवड : आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या लोकांचा आणि विशेषतः माण, खटाव तालुक्यांतील जनतेचा विविध आजारांवर दवाखान्यात होणारा अवाढव्य खर्च बंद करण्यासाठी आम्ही मायणी मेडिकल कॉलेजच्या माध्यमातून प्रयत्नशील आहोत. कोणताही रुग्ण एखाद्या आरोग्य योजनेत पात्र ठरला नाही तरी त्याच्यावर उपचार करण्यासाठी आम्ही प्राधान्य देणार आहोत, असे प्रतिपादन माण-खटावचे आ. जयकुमार गोरे यांनी केले.
मायणी मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलमध्ये सुरू करण्यात येणाऱ्या विविध आजारांच्यावरील उपचार व मार्गदर्शन मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी डॉ. एम. आर. देशमुख, सचिव सोनिया गोरे, जिल्हा परिषद सदस्य अरुण गोरे, भाजपा तालुकाध्यक्ष धनंजय चव्हाण, धोंडिराम बापू मोरे, रामभाऊ देवकर, अर्चना खरात, जयवंत पाटील, प्रदीप खुडे, अनिल माळी, सोमनाथ भोसले, विशाल बागल, काका बनसोडे, प्रा. सदाशिव खाडे, डॉ. सागर खाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार गोरे म्हणाले, विविध आजारांवरील दवाखान्यातील उपचार आता लोकांच्या आयुष्यातील अविभाज्य घटक बनले आहेत. त्यासाठी रुग्णांना मोठा खर्चही करावा लागतो. आम्ही मायणी मेडिकल कॉलेजमध्ये सर्वसामान्यांना उपचार मिळण्यासाठी ५०० बेडचे अद्ययावत हॉस्पिटल उभे केले आहे. वेळेत उपचार न होणाऱ्या रुग्णांना उपचाराविना जीव गमवावा लागण्याच्या घटना अनेक ठिकाणी घडतात. त्यामुळे आम्ही प्रत्येक गावात हॉस्पिटलच्या वतीने बस सुरू करणार आहोत. त्याद्वारे रुग्णांना मायणी हॉस्पिटल येथे आणून उपचार केले जाणार आहेत. गोरगरीब रुग्णांना आर्थिक झळ बसणार नाही याची दक्षता आम्ही घेणार आहोत. रुग्णांची माहिती घेण्यासाठी गावोगावी आरोग्यसेविकांची नेमणूक केल्या जात आहेत. गावागावातील रुग्णांना कोणता आजार आहे, कोणत्या उपचारांची गरज आहे, याची माहिती संकलित करण्यात येणार आहे. हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येत आहे.
यावेळी डॉ. एम. आर. देशमुख, डॉ. खाडे यांनीही मार्गदर्शन केले.
चौकट:
आजार कोणताही असूद्या, उपचार मायणीतच !
रुग्णांना कोणताही आजार असला तरी घाबरून न जाता, इकडे तिकडे पळापळ न करता मायणी मेडिकल कॉलेजमधील हॉस्पिटलमध्ये सर्व उपचार व्यवस्थितपणे होणार आहेत. आरोग्यसेवा हीच ईश्वर सेवा या भावनेतून आमचा वैद्यकीय स्टाफ काम करणार आहे.
२०
जयकुमार गोरे
मायणी मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलमध्ये सुरू करण्यात येणाऱ्या विविध आजारांवरील उपचार व मार्गदर्शन मेळाव्यात जयकुमार गोरे बोलत होते.