सातारा : गेल्या अनेक दिवसांपासून पक्ष बदलाची चर्चा सुरू असलेले आणि भाजपच्या राज्यातील नेत्यांच्या भेटी घेऊन स्वत:ला चर्चेत ठेवणाऱ्या जिल्ह्यातील नेत्यांनी आजही आपला निर्णय जाहीर केला नाही. रामराजे नाईक-निंबाळकर यांनी मेळावा घेऊन आठ दिवसांत निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले. तर काँग्रेसचे आमदार आनंदराव पाटील यांनी आपण बेरजेचे राजकारण करत असल्याचे सांगून घुमजाव केले आहे.
विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी गुरुवारी सायंकाळी फलटणला महत्त्वाच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्यावेळी शिवसेनेत जाण्याचा निर्णय झाल्याचे समोर आले होते. तर शुक्रवारी फलटणला कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. यावेळी शरद पवारांना आपण दुखावू शकत नाही. तरुण पिढीसाठी अजून खूप काही करायचे आहे. त्यामुळे काय निर्णय घ्यायचा, हे पुढील आठ दिवसांत ठरविण्यात येईल, अशी भूमिका त्यांनी मेळाव्यात सध्यातरी घेतली आहे. त्यामुळे रामराजे बाहेर पडणार किंवा नाही, याबाबत पुन्हा संभ्रम निर्माण झाला आहे.
कºहाडमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे विश्वासू व काँग्रेसचे आमदार आनंदराव पाटील यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. चार दिवसांपूर्वी भाजपकडे ते झुकल्याचे स्पष्ट झाले असताना शुक्रवारच्या मेळाव्यात मात्र त्यांनी आपण बेरजेचे राजकारण करत असून, चव्हाण कुटुंबीयांशी आपले खूप वर्षांपासूनचे संबंध आहेत. त्यांच्याशी दगाफटका करू शकत नाही, असे स्पष्ट करत एकप्रकारे घुमजावच केले.मेळाव्यात घोषणा टाळलीकºहाड उत्तर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे नेते धैर्यशील कदम यांनी उंब्रजमध्ये मेळावा घेतला. यावेळी त्यांनी शिवसेना का भाजपमध्ये प्रवेश करायचा? हे अजून ठरलेले नाही, मात्र आपण निवडणूक लढविणार, असे त्यांनी ठामपणे सांगितले.