दैव बलवत्तर म्हणून वाचले आठ प्राण
By admin | Published: August 30, 2015 09:51 PM2015-08-30T21:51:38+5:302015-08-30T21:51:38+5:30
वाईत अपघात : रसायनने भरलेल्या टँकरची जीपला धडक; तिघांची प्रकृती गंभीर
वाई : वाई-मांढरदेव रस्त्यावरील चांदणी चौकात रसायनने भरलेल्या टँकरने वडाप जीपला जोरदार धडक दिली. या अपघातात जीपमधील आठ प्रवासी जखमी झाले. त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. हा अपघात रविवारी दुपारी १२.३० च्या सुमारास घडला.घटनास्थळ व पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वाई-मांढरदेव रस्त्यावर औद्योगिक वसाहत आहे. रविवरी दुपारी मुंबईहून (गोवंडी) आलेला रसायनने भरलेला टॅँकर (एमएमच ०४ एफपी १७७६) हा औद्योगिक वसाहतीतील रसायन कंपनीकडे निघाला होता. दरम्यान, चांदणी चौकात आल्यानंतर धावडी येथून वाईकडे येणाऱ्या वडाप जीपला (एमएच ११ एफ १७०८) टॅँकरने समोरून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, वडाप जीप तीन-चार पलट्या खाऊन रस्त्याकडेला पलटी झाली.
या अपघातात जीपमधील आठ प्रवासी जखमी झाले. त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर असून, जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गंभीर जखमींमध्ये अभिजित गाढवे (वय २९), अक्षय उंबरकर(१९) व मंदा दशरथ उंबरकर (३७) यांचा समावेश आहे़ तर संग्राम सपकाळ, विजया मांढरे, सुमन पोतेकर, गनिजा पोतेकर, हृषीकेश नलावडे हे किरकोळ जखमी झाले आहेत़ अपघातात बोपर्डी, धावडी, पिराचीवाडी, सुलतानपूर या गावांतील नागरिकांचा समावेश आहे़ किरकोळ जखमींना उपचार करून सोडण्यात आले़
अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नाही़ टॅँकरचा चालक मतीन खान (वय, ४० रा. शिवाजीनगर, गोंवडी) याला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)
चांदणी चौक बनला मृत्यूचा सापळा
एमआयडीसी येथील चांदणी चौकात अपघात होणे ही नित्याची बाब बनली असून, परिसरातील व्यावसायिक, कामगार व ग्रामस्थांनी या ठिकाणी गतिरोधक बसविण्याची मागणी केली आहे़ चांदणी चौकात अनेकांना आपला जीव गमवावा लागला असून, कित्येक जण गंभीर जखमी झाले आहेत़ बांधकाम विभागाने त्वरित या ठिाकाणी गतिरोधक बसवावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा धावडीचे माजी सरपंच सतीश मांढरे यांनी दिला आहे.