शिवरायांच्या दर्शनातून कामाची ऊर्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:51 AM2021-02-20T05:51:40+5:302021-02-20T05:51:40+5:30
सातारा : ‘किल्ले प्रतापगडावर शिवजयंतीनिमित्त जिल्हा परिषदेचे अधिकारी, पदाधिकारी अन् सदस्य येतात. येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेतल्यानंतर ...
सातारा : ‘किल्ले प्रतापगडावर शिवजयंतीनिमित्त जिल्हा परिषदेचे अधिकारी, पदाधिकारी अन् सदस्य येतात. येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेतल्यानंतर वर्षभर काम करण्याची ऊर्जा मिळते,’ असे मत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले यांनी व्यक्त केले. दरम्यान, कबुले यांनी महाबळेश्वर पंचायत समितीच्या इमारतीवरील बांधकामांसाठी १० लाखांची घोषणा केली.
महाबळेश्वर पंचायत समितीत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. किल्ले प्रतापगडावरील शिवजयंतीचा कार्यक्रम झाल्यानंतर सर्व अधिकारी, पदाधिकारी, सदस्य पंचायत समितीत आले होते. यावेळी ज्येष्ठ नेते बाळासाहेब भिलारे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन) मनोज जाधव, शिक्षण समिती सभापती मानसिंगराव जगदाळे, जिल्हा परिषद सदस्य भीमराव पाटील, महाबळेश्वरच्या सभापती अंजना कदम, उपसभापती संजय गायकवाड आदी उपस्थित होते.
शिक्षण समिती सभापती मानसिंगराव जगदाळे म्हणाले, ‘कोरोनामुळे ज्या पद्धतीने जिल्हा परिषद पळवायला पाहिजे. तशी आम्ही पळवू शकत नाही. कारण कोरोनामुळे वर्षभरापासून आम्ही फक्त खुर्च्या सांभाळत आहोत. कामासाठी पैसे पाहिजेत. अर्थकारण बिघडलेले आहे.’
बाळासाहेब भिलारे म्हणाले, ‘पंचायत राज संकल्पना दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या संकल्पनेतून तयार झाली. प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करण्यात आला आहे. तेव्हापासून प्रतापगडावर शिवजयंती सोहळ्याची परंपरा निर्माण झाली. जिल्हा परिषदेनेही आतापर्यंत ही परंपरा जोपासलेली आहे.
.....................................................