ऐतिहासिक किल्ले वासोटा सर करण्यासाठी बालमावळ्यांचा उत्साह !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 05:12 AM2021-02-18T05:12:03+5:302021-02-18T05:12:03+5:30
पेट्री : ऐतिहासिक किल्ले वासोटा पाहण्यासाठी बहुसंख्य पर्यटक व गिरीप्रेमी येतात. काही बालमावळ्यांचा उत्साहदेखील मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. साताऱ्यातील ...
पेट्री : ऐतिहासिक किल्ले वासोटा पाहण्यासाठी बहुसंख्य पर्यटक व गिरीप्रेमी येतात. काही बालमावळ्यांचा उत्साहदेखील मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. साताऱ्यातील हेमर चव्हाण या पाच वर्षाच्या चिमुकल्याने मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराज की जय... या घोषणेमुळे आलेल्या उत्साहाच्या बळावर किल्ले वासोटा पूर्णपणे यशस्वीरित्या सर केला. त्याचे गिरीप्रेमींकडून विशेष कौतुक होत होते.
कृपा साळुंके, ऋचा चव्हाण, मनस्वी साळुंके यांनी वासोटा सर केला.
कोयनेच्या घनदाट अभयारण्यात वासोटा हा वनदुर्ग. दुर्गप्रेमींचे ट्रेकिंगसाठी आकर्षक ठिकाण म्हणजे ऐतिहासिक किल्ले वासोटा. व्याघ्र प्रकल्प व बामणोली वन्यजीव वनक्षेत्रातील किल्ले वासोटा बफर व कोअर क्षेत्रात येतो. साहसी ट्रेकची आवड असणारे अनेक दुर्गप्रेमींचे आकर्षण. वन खात्याच्या चेकपोस्टपासून पुढे खड्या चढाईने दोन तासांत किल्याच्या माथ्यावर पोहोचता येते. संपूर्ण महाराष्ट्रातून पर्यटक मोठ्या संख्येने वासोटा ट्रेकिंगसाठी येत आहेत.
बामणोलीपासून साधारण एक-दीड तास बोटीने प्रवास करून मेट इंदवलीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगसाठी बांबूचे बॅरिकेट्स तसेच पर्यटक, गिरीप्रेमींची टेम्प्रेचर तपासणी, तद्नंतर पर्यावरणाचा समतोल तसेच वन्यजीवांच्या सुरक्षिततेसाठी सर्व प्रकारच्या प्लास्टिकची नोंद करून वन विभागाच्या परवानगीने दुर्गवारीस सुरुवात होते. शनिवार, रविवारी बहुसंख्य पर्यटक ट्रेकिंगसाठी येताना पाहायला मिळतात.
चोंहोबाजूला दाट हिरवीगार झाडी. त्यात खडतर तसेच पूर्णतः चढ-उतार म्हणजे गिरीप्रेमींसाठी खास पर्वणीच. यामुळे ट्रेकिंगसाठी बहुतांशी पर्यटक या ठिकाणी येतात.
दरम्यान, दीड-दोन तासांचा पायी प्रवास करत ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय...’, ‘छत्रपती संभाजी महाराज की जय...’, ‘जय भवानी जय शिवाजी...’ अशा घोषणा देत मोठ्या उत्साहाने हा किल्ला सर करताना दिसतात. यामध्ये चिमुकल्यांचादेखील उत्साह मोठ्या प्रमाणावर दिसून येत होता.
चौकट
खाचखळगे अन् दगडगोटे
अवघा पाच वर्षांचा बालमावळा कोणाच्याही मदतीशिवाय न दमता मोठ्या उत्साहाने खाचखळगे, घसरटे दगडगोटे पार करून दोन तास खडी चढाई व दीड तास तीव्र उतार यशस्वीरित्या पार करताना पर्यटकांचे लक्ष वेधून घेत होता. दरम्यान, त्याच्यासमवेत सात ते दहा वर्षाच्या तिघी चिमुरड्या यांचेदेखील गिरीप्रेमींकडून प्रेरणा, प्रोत्साहन मिळावे यासाठी टाळ्या वाजवून विशेष कौतुक केले जात होते.
कोट
आतापर्यंत बहुतांशी गडकोट, किल्यांना भेटी दिल्या. परंतु हा ऐतिहासिक वासोटा किल्ला सर करणं म्हणजे मोठं आव्हान होतं. चढताना आमची दमछाक होत होती. परंतु या चिमुकल्या मावळ्यांचा उत्साह पाहून त्यांच्याकडून आम्हाला प्रेरणा मिळत गेली.
- महेंद्र साळुंके,
गिरीप्रेमी मुंबई.
१७किल्ले वासोटा
अवघड असा किल्ले वासोटा पाच वर्षांच्या चिमुरड्यानेही सहज सर केला. (छाया : सागर चव्हाण)