‘माझी वसुंधरा’ अभियान यशस्वी करणे प्रत्येकाची जबाबदारी : गुदगे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:32 AM2021-01-04T04:32:43+5:302021-01-04T04:32:43+5:30
मायणी : माझी वसुंधरा अभियान यशस्वी करण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. यासाठी पर्यावरणाचे संरक्षण, स्वच्छ सुंदर परिसर, वृक्षलागवड व प्लास्टिक ...
मायणी : माझी वसुंधरा अभियान यशस्वी करण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. यासाठी पर्यावरणाचे संरक्षण, स्वच्छ सुंदर परिसर, वृक्षलागवड व प्लास्टिक वापरण्यावर बंदी घालण्यात आलेली आहे. या उपक्रमाचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. प्रत्येकाची जबाबदारी असून पारंपरिक ऊर्जा व रेनवॉटर हार्वेस्टिंग इमारतींच्या करात सवलत देण्यात येणार आहे, असे प्रतिपादन सरपंच सचिन गुदगे यांनी केले.
मायणी येथे ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी, कर्मचारी, विविध सामाजिक, शैक्षणिक संघटना, अंगणवाडी सेविका, आशा, मदतनीस यांसह विविध शासकीय व निमशासकीय क्षेत्रात कार्य करीत असलेले कर्मचारी यांना शपथ देण्यात आली. यावेळी ते बोलत होते. या उपक्रमाचा एक भाग म्हणून ग्रामपंचायतीच्या चौदाव्या वित्त आयोगातून मंजूर करण्यात आलेल्या इंदिरानगर भागात असलेल्या गटारीच्या बंदिस्ती कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
सातारा जिल्ह्यामध्ये दहा हजार लोकसंख्येच्या वर असलेल्या सहा गावांमध्ये हे अभियान राबवण्यात येणार आहे. खटाव तालुक्यातील मायणी हे एकमेव गाव आहे. या गावामध्ये शासनामार्फत ‘माझी वसुंधरा’ अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानात लोकसहभाग हा महत्त्वपूर्ण घटक आहे.
चौकट :
प्लास्टिकविरोधी कारवाई करणार
ग्रामपंचायत हद्दीमध्ये असलेल्या इमारतीमध्ये पारंपरिक ऊर्जा व सौरऊर्जेचा वापर तसेच रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबविणाऱ्या ग्रामस्थांना करांमध्ये सवलत देण्यात येणार आहे. तसेच प्लास्टिक वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. यासाठी भरारी पथक नेमण्यात येणार आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी व ग्रामस्थांनी सहकार्य करावे.