कोबीचा दर ढासळल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:41 AM2021-04-09T04:41:26+5:302021-04-09T04:41:26+5:30

औंध : कष्ट करून पिकविलेल्या पिकाचे चार पैसे हातात येतील, या आशेने औंध परिसरातील कोबीची शेती केलेल्या शेतकऱ्यांच्या हाती ...

The fall in cabbage prices has hit farmers hard | कोबीचा दर ढासळल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका

कोबीचा दर ढासळल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका

Next

औंध : कष्ट करून पिकविलेल्या पिकाचे चार पैसे हातात येतील, या आशेने औंध परिसरातील कोबीची शेती केलेल्या शेतकऱ्यांच्या हाती निराशा आली आहे. एकीकडे लाॅकडाऊनमुळे बाजार बंद तर दुसरीकडे मार्केटमध्ये दर कोसळल्याने दुहेरी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी कोबीचा प्लाॅट सोडून दिला आहे. औंध परिसरात मोठ्या अपेक्षेने काही शेतकऱ्यांनी आर्थिक गुंतवणूक करून शेतात भाजीपाला लागवड केली आहे. कोबी पिकाची योग्य देखभाल करून भरघोस उत्पादन विक्रीसाठी तयार केले आहे. पीक पाण्याची टंचाई असली तरी ठिबकद्वारे प्लाॅटची निगा राखली आहे. सध्या माल विक्रीसाठी तयार झाला आहे. मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आठवडा बाजार बंद झाले आहेत. त्यामुळे बाजारात मालाची विक्री करता येत नाही आणि मार्केटला माल पाठवावा तर दर ४ रुपये किलोवर आले आहेत. मालाची तोडणी, भरणी, वाहतूक आणि मार्केटमधील खर्चाचे आकडे पाहिले तर विक्री करून आलेली रक्कम आणि खर्चाची आकडेवारी यांचा ताळमेळ कुठेच बसत नसल्याने तोट्याची शेती करण्यापेक्षा हाताशी आलेला प्लाॅट सोडून देण्याशिवाय शेतकऱ्यांपुढे पर्याय उरला नाही. तर काही शेतकऱ्यांनी उभ्या पिकामध्ये आपली जनावरे सोडली आहेत.

कोट..

शेतीतून चार रुपये हातात येतात, या आशेपोटी शेतकरी कर्जे काढून शेतात भांडवल घालतात. मात्र, मार्केटमध्ये दर ढासळत असल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस शेतकरी आर्थिक गर्तेत जात आहे.

- अनिल माने, शेतकरी औंध

०८औंध

फोटो: औंध येथे शेतकऱ्यांनी दर ढासळल्याने कोबीचे प्लॉट सोडून दिले आहेत.(छाया : रशिद शेख)

Web Title: The fall in cabbage prices has hit farmers hard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.