कोरेगावात लवकरच शेतकरी मॉल
By Admin | Published: October 14, 2015 10:24 PM2015-10-14T22:24:58+5:302015-10-15T00:29:31+5:30
खरेदी-विक्री संघाचा निर्णय : संघाला गतवैभव मिळवून देण्याची शशिकांत शिंदे यांची ग्वाही
कोरेगाव : ‘शेतकऱ्यांच्या विकासासाठी कायम कडिबद्ध असलेल्या कोरेगाव तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघाच्या उत्पन्नवाढीसह नवनवीन योजनांना नेहमीच पाठबळ राहील. संघाला गतवैभव मिळवून देण्यासाठी कटिबद्ध राहणार आहे,’ अशी ग्वाही देत इंग्लिश स्कूलसमोरील जागेमध्ये पेट्रोल पंप अथवा शेतकरी मॉल उभा करण्याचा संचालक मंडळाचा निर्णय अत्यंत स्तुत्य आहे,’ असे प्रतिपादन आमदार शशिकांत शिंदे यांनी केले. आ. शिंदे यांनी संघाच्या मुख्य कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी संघाचे अध्यक्ष शहाजी भोईटे व ज्येष्ठ संचालक शहाजीराव बर्गे, सहायक निबंधक (सहकारी संस्था) युसूफ अमीर शेख उपस्थित होते.
आमदार शिंदे म्हणाले, शेतकऱ्यांना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मॉडर्न इंग्लिश स्कूलसमोरील जागेमध्ये पेट्रोलपंप अथवा शेतकरी मॉल उभा करण्याचा संचालक मंडळाचा निर्णय अत्यंत स्तुत्य आहे.
शहाजी भोईटे यांनी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर संघाची किरोली (वाठार) शाखा कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला असून, तारगाव, वाठारसह पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना रासायनिक खते, कीटकनाशके, औषधे, विद्राव्य खते व बी-बियाणे उपलब्ध केले जातील, असे सांगितले.
यावेळी शहाजीराव बर्गे, युसूफ अमीर शेख यांनी मनोगत व्यक्त केले. राजेंद्र येवले यांनी स्वागत केले. संचालक अप्पासाहेब चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष प्रल्हाद माने यांनी आभार मानले.कार्यक्रमास संचालक विद्याधर बाजारे, भागवत घाडगे, अधिक माने, काकासाहेब बर्गे, निर्मला जाधव, शैला निकम, मुकुंद जगदाळे, गंगाराम खताळ यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
‘संघाच्या शाखांची परिस्थिती सुधारली पाहिजे, यासाठी संचालक मंडळाने धोरणात्मक निर्णय घेतल्यास, सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. शेतकरी मॉल संदर्भात प्रशासकीय पातळीवर या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी व्हावी, यासाठी प्रयत्न केले जातील. वाठार स्टेशन येथे संघाचे व्यापारी संकुल उभारणीत कसलीही अडचण येणार नाही.
- शशिकांत शिंदे, आमदार