जरंडेश्वर कारखानाप्रश्नी जिल्ह्यातील शेतकरी एकवटले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 07:06 PM2021-07-09T19:06:14+5:302021-07-09T19:08:20+5:30
Jarndeshwar Sugar factory Satara : जरंडेश्वर कारखाना ईडीने जप्त केला असला तरी तो सुरूच ठेवावा. कोरेगावसह जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसाचे गाळप करावे, आदी विविध मागण्यांसाठी सर्वपक्षीय कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी शुक्रवारी तहसीलदार अमोल कदम यांना निवेदन सादर केले.
कोरेगाव : जरंडेश्वर कारखाना ईडीने जप्त केला असला तरी तो सुरूच ठेवावा. कोरेगावसह जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसाचे गाळप करावे, आदी विविध मागण्यांसाठी सर्वपक्षीय कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी शुक्रवारी तहसीलदार अमोल कदम यांना निवेदन सादर केले.
दरम्यान, कोरोनाचा फैलाव आणि जमावबंदी आदेश लागू असल्याने मोर्चा काढण्याचा निर्णय स्थगित करण्यात येऊन प्रशासनाला निवेदन सादर करण्याचे सर्वानुमते ठरले.
चिमणगाव येथील जरंडेश्वर कारखाना ईडीने जप्त केल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. कारखाना बंद पडता कामा नये, तो सुरूच राहावा, त्याच्यावर हजारोंचा प्रपंच अवलंबून आहे. त्यामुळे कारखाना सुरू ठेवण्याच्या मागणीसाठी कोरेगावात शुक्रवारी मोर्चा काढण्यात येणार होता, त्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. मात्र, कोरोनाचा प्रकोप आणि जमावबंदी आदेश या बाबी लक्षात घेऊन मोर्चा काढण्याचे स्थगित करण्यात आले.
जिल्हा बँकेच्या कोरेगाव शहर शाखेपासून तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारापर्यंत जमलेले शेतकरी चालत गेले. पोलिसांनी तेथेच त्यांना अडविले, त्यानंतर मोजक्याच पदाधिकारी व कार्यकर्त्यांना तहसील कार्यालयात जाऊ देण्यात आले.
वाईचे शशिकांत पिसाळ, राजेंद्र भोसले, किरण बर्गे, विलासराव बर्गे, प्रतिभाताई बर्गे, युवराज कदम, विकास साळुंखे यांच्यासह कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी तहसीलदार अमोल कदम यांना निवेदन सादर केले. आपल्या भावना शासनापर्यंत पोहोचवू, अशी ग्वाही तहसीलदारांनी दिली.
तब्बल २२ वर्षांनंतर कोरेगावने अनुभवला अभूतपूर्व बंदोबस्त
कोरेगावात १९९९ मध्ये दंगल झाल्यानंतर शहर सुमारे आठ दिवस बंद होते. त्या काळी मोठा पोलीस बंदोबस्त होता. त्यानंतर प्रथमच २२ वर्षांनंतर जरंडेश्वर कारखान्याच्या निमित्ताने कोरेगावला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. चौकाचौकांत आणि टप्प्याटप्प्यांवर पोलीस तैनात होते. तहसील कार्यालयासमोर अग्निशामक बंब व रुग्णवाहिका तैनात करण्यात आली होती. पोलिसांबरोबरच नायब तहसीलदार हे कार्यकारी दंडाधिकारी या नात्याने रस्त्यावर उतरले होते.