कोरेगाव परिसरातील शेतकऱ्यांना तीन वर्षांची बिले एकाचवेळी, भरण्यास आठ दिवसांची मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 11:02 AM2017-11-15T11:02:22+5:302017-11-15T11:09:33+5:30

कोरेगाव शहर व परिसरातील शेतकऱ्यांना २०१४ पासूनची वीजबिले एकाचवेळी देण्यात आलेली असून, वसुलीसाठी सातत्याने तगादा लावला जात आहे. सद्य:स्थितीत शेतकरी अडचणीत असताना महावितरण कंपनी वीज जोड तोडण्याची धमकी देत आहे.

For the farmers of Koregaon area, the three-year bills at the same time, the eight-day deadline to pay | कोरेगाव परिसरातील शेतकऱ्यांना तीन वर्षांची बिले एकाचवेळी, भरण्यास आठ दिवसांची मुदत

कोरेगाव परिसरातील शेतकऱ्यांना तीन वर्षांची बिले एकाचवेळी, भरण्यास आठ दिवसांची मुदत

Next
ठळक मुद्देअन्यायकारक वसुलीसाठी शेतकऱ्यांवर दबाव, वीज जोड तोडण्याची धमकी वसुली न थांबविल्यास २० नोव्हेंबरपासून कामकाज ठप्प केले जाणार महावितरण कंपनीच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा भूमाता किसान मंचचा इशारा

कोरेगाव : कोरेगाव शहर व परिसरातील शेतकऱ्यांना २०१४ पासूनची वीजबिले एकाचवेळी देण्यात आलेली असून, वसुलीसाठी सातत्याने तगादा लावला जात आहे. सद्य:स्थितीत शेतकरी अडचणीत असताना वीज जोड तोडण्याची धमकी दिली जात आहे. महावितरण कंपनीने अन्यायकारक वसुली तातडीने न थांबविल्यास दि. २० नोव्हेंबरपासून कंपनीच्या कार्यालयांना टाळे ठोकण्याचा इशारा संतप्त शेतकऱ्यांनी दिला आहे.


भूमाता किसान मंचचे जिल्हाध्यक्ष धर्मराज जगदाळे, कार्याध्यक्ष शंकर गोळे, नगरसेवक महेश बर्गे, सुनील बर्गे, सचिन बर्गे, हणमंतराव जगदाळे, जोतिराम वाघ, सुनील वाघ, सम्राट बर्गे, अभय बर्गे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार विठ्ठलराव काळे व तहसील कार्यालयातील निवासी नायब तहसीलदार श्रीरंग मदने यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या भावना प्रशासनापुढे व्यक्त केल्या.


निवेदनात म्हटले आहे की, वीज वितरण कंपनीच्या कोरेगाव उपविभागांतर्गत सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या वीज कनेक्शनची बिले २०१४ पासूनची आता देण्यात आलेली आहेत. ही बिले भरण्यास अल्प कालावधी देण्यात आलेला असून, त्याबाबत स्पष्ट शब्दात एकही अभियंता अथवा वीज वितरण कंपनीचा कर्मचारी ठोस माहिती देत नाही.

३० हजार रुपयांच्या आत वीज बिल असल्यास पाच हप्त्यांमध्ये तर ३० हजार रुपयांवर बिल असल्यास दहा हप्त्यांमध्ये भरण्यास सक्ती केली जात आहे. चालू वीज बिलांबरोबरच प्रत्येक हप्ता भरण्यासाठी तगादा लावला जात आहे.

याबाबत कंपनीच्या उपविभागीय कार्यालयात चौकशी केल्यावर राज्य पातळीवर कंपनीने घेतलेला निर्णय असून, आम्हाला त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश आहेत, असे सांगून शेतकऱ्यांची अक्षरश: बोळवण केली जात आहे.


गेल्या वर्षी कोरेगाव तालुक्यात दुष्काळी परिस्थिती होती. धोम डाव्या कालव्यातून पाण्याची व्यवस्थित आवर्तने न आल्याने उसाबरोबरच अन्य पिके जळून गेली. शेतकरी संघटनांच्या आंदोलनांमुळे वेळेवर उसाची तोड झाली नाही आणि कारखान्यांकडून वेळेत पेमेंट आलेली नाहीत.

शासनाने कर्जमाफीबाबत केवळ घोषणा केली असून, आॅनलाईन अर्ज भरून घेण्यापलीकडे काही एक केले नाही. त्याबाबत शेतकरी अनभिज्ञ आहे. यावर्षी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून, सोयाबीनसह घेवडा ही नगदी पिके हातची गेली आहेत.

शासनाने हमी भाव जाहीर करून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची बोळवण केली असून, शेतकऱ्यांचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे.


कोरेगाव परिसरातील सक्तीने सुरू असलेली वीज बिल वसुली थांबवावी, अभियंत्यांना लेखी स्वरुपात सूचना द्याव्यात अन्यथा आम्ही दि. २० नोव्हेंबर २०१७ पासून कंपनीच्या कार्यालयांना टाळे ठोकणार असून, जोपर्यंत आमची वसुली थांबवली जात नाही तोपर्यंत या कार्यालयांमधील कामकाज ठप्प केले जाणार आहे. कंपनीच्या कामकाजाच्या पद्धतीत बदल न झाल्यास अन्य मार्गाने तीव्र आंदोलन केले जाणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.


यावेळी समाधान तुपे, उमेश जगदाळे, जयवंत पवार, अरुण पवार, गोरख जगदाळे, बापूसाहेब जाधव, विशाल चव्हाण, प्रमोद बर्गे, बाळकृष्ण बर्गे, सागर जगदाळे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

Web Title: For the farmers of Koregaon area, the three-year bills at the same time, the eight-day deadline to pay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.