कुसूर : बामणवाडी, ता. कऱ्हाड येथील शेतकऱ्यांना विद्युतपुरवठा करणाऱ्या लाईनच वारंवार अनेक कारणांमुळे वीजपुरवठा खंडित होत आहे. याबाबत शेतकऱ्यांनी वीजवितरण कंपनीला लेखी तक्रार देऊनही कोणतीही दखल घेतली जात नाही. परिणामी, शेतकऱ्यांनी स्वखर्चाने फ्यूजबॉक्समध्ये निकामी झालेले इलेक्ट्रिक साहित्य व लाईटला अडथळे ठरणारी झाडे तोडण्यासाठी पाच हजार रुपये जमा केले आहेत. निकामी साहित्याची खरेदी करून झाडे तोडण्यासाठी पाच हजार रुपये जमा केले आहेत. निकामी साहित्याची खरेदी करून झाडे तोडण्याची मोहीम हाती घेतली आहे. मात्र कमी-जास्त दाबाने होणारा विद्युतपुरवठा सुरळीत चालू करण्याचे काम वीजवितरण करणार का? असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी केला आहे. बामणवाडी गावाचा विस्तार पाहता संपूर्ण गाव डोंगर पायथ्यालगत वसले आहे. परिणामी गावाला नदी नाही, कायमस्वरूपी ओढ्याला पाणी नाही. याचा फटका विहिरीतील पाणी साठ्यांवर दिसून येत आहे. तर पावसाने ओढ दिल्याने संपूर्ण शेती धोक्यात आली आहे. काही शेतकऱ्यांच्या विहिरींमधील उपलब्ध पाणी पंपांवर उपसा करून शेतीली देऊन पिके वाचविण्याचा खडतर प्रयत्न सुरू आहे. मात्र कमी दाबाने विद्युतपुरवठा होत असल्यामुळे पंप चालत नाहीत. तर लाईनमधील वीजवाहिन्यांमध्ये झाडांच्या फांद्या घुसल्याने फ्यूज वारंवार जाऊन वीजपुरवठा खंडित होत आहे. शेतीच्या विद्युत पंपांना वीजपुरवठा करणाऱ्या भगीरथ वाहिनीला सध्या भारनियमन असल्याने आठवड्यातील फक्त चार दिवसच दिवसाचे काही तास वीजपुरवठा चालू असतो. या कालावधीत वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे शेतकरी पुरता हैराण झाला आहे. याबाबत वीजवितरण विभागाला वारंवार तोंडी व लेखी तक्रार देऊनही यावर कोणताही तोडगा काढण्यात आला नाही. वीजवितरण विभाग लक्ष देत नसल्याने अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांनी पैसे जमा करून डी.पी.मधील निकामी झालेल्या फुटलेल्या फ्यूज बॉक्सचे साहित्य स्वखर्चाने नवीन खरेदी केले आहेत. तर विद्युत खांबावरील वीज वाहिन्यांमध्ये घुसलेल्या झाडांच्या फांद्या, झाडे स्वत:च तोडण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्यामुळे एकावेळी सर्व विद्युत पंप चालत नाहीत. यावेळी कमी जादा विद्युतपुरवठा झाल्यास पंप ही जळले आहेत. (वार्ताहर)वायरमन म्हणे... फ्यूज बसविता येत नाही !बामणवाडीत नेमणूक केलेला जनमित्राला (वायरमन) म्हणे, फ्यूज बसवता येत नाही. अनेकदा फ्यूज गेल्यानंतर संबंधित जनमित्र डी. पी. जवळ उपस्थित असला तरी शेतकऱ्यांनाच फ्यूज बसवावी लागते. मात्र चिनीमातीच्या असलेल्या फ्यूजांचे तीन-तीन तुकडे झालेले असल्यामुळे तोही धोका शेतकऱ्यांनाच पत्करावा लागत आहे. या फ्यूजच्या तुकड्यांमुळे जर वीजवाहक तारेला हात लागला तरी जीवितास हानी पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही. विहिरींची मीटर जळालीकमी जादा दाबाने वीजपुरवठा झाल्याने विहिरींवरील पाच ते सहा रिडिंग मीटर जळाली आहेत. ही मीटर बदलून मिळावी म्हणून वारंवार मागणी करूनही मीटर देण्यात आली नाहीत. परिणामी शेतकऱ्यांना स्वखर्चानेच मीटर खरेदी करून बसवावी लागतील.
सुरळीत वीज पुरवठ्यासाठी शेतकऱ्यांची पदरमोड
By admin | Published: August 30, 2015 10:01 PM