रामापूर : यावर्षी जून महिन्यात वेळेत पाऊस सुरू झाल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या. मात्र, गेल्या १५ दिवसांत तालुक्यात पावसाची एकही सर पडली नसल्याने तालुक्यातील शेतकरी चिंतेत आहेत. कोरोनाच्या महामारीत पैशांची जुळवाजुळव करून शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी केले, पण पिकाच्या महत्त्वाच्या वेळीच पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. शेतकरी पावसाची प्रतीक्षा करत आहेत.
पाटण तालुक्यातील महत्त्वाची असणारी भात, ज्वारी, भुईमूग आदी पिकांची पेरणी वेळेत करण्यात आली. मात्र, पेरणी झाल्यानंतर नियमितपणे रोज पाऊस अपेक्षित आहे. तो तालुक्यात पडलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी भांगलण आणि कोळपणी करून घेतली खरी पण या कोळपणीमुळे शेतातील असणारी ओल आता नाहीसे होत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात पाऊस पडला नाही तर तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे राहील.
हवामान खात्याने दर्शविल्याप्रमाणे तालुक्यात दि. १० जून ते २० जून या कालावधीत पाऊस पडला. मात्र, त्यानंतर हवामान खात्याचा अंदाज मात्र खोटा ठरत आहे. फक्त तालुक्यात काळे ढग येतात पण पाऊस पडत नाही. तालुक्यातील शेतकरी पावसाकडे डोळे लावून आहेत. तालुक्यातील बहुतांश शेती ही पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे भात लागण मात्र खोळंबली आहे. पाऊस नसल्याने भाताच्या रोपांची वाढ चांगल्याप्रकारे होऊ शकली नसल्याने जर पुढील आठ दिवसात पाऊस पडला नाही तर मात्र दुबार पेरणीचे संकट उभे राहील, अशी भीती शेतकऱ्यांना वाटत आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी दमदार पावसाची प्रतीक्षा करत आहेत.
चौकट
पाटण तालुक्यातील केर विभागात झालेल्या ढगफुटीनेही शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यामधून काही पिके वाचली आहेत, ती देखील वेळेत पाऊस न पडल्यास नष्ट होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.
फोटो - पावसाअभावी भाग लागण रखडली तर काही ठिकाणी भातांची रोपे करपून जात आहेत.