साताऱ्यातील यवतेश्वर येथे दोन कारची भीषण धडक; तरुणी ठार; एक गंभीर

By दत्ता यादव | Published: July 29, 2023 07:10 PM2023-07-29T19:10:56+5:302023-07-29T19:11:14+5:30

एअर बॅग उघडल्या पण.., काही वर्षांपूर्वी वडिलांचे अन् आता मुलीच्याही अपघाती मृत्यूने हळहळ 

Fatal collision between two cars at Yavateshwar in Satara; Young woman killed; A serious one | साताऱ्यातील यवतेश्वर येथे दोन कारची भीषण धडक; तरुणी ठार; एक गंभीर

साताऱ्यातील यवतेश्वर येथे दोन कारची भीषण धडक; तरुणी ठार; एक गंभीर

googlenewsNext

सातारा : सातारा शहराजवळ असणाऱ्या यवतेश्वर घाट परिसरात शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास दोन कारची समोरासमोर भीषण धडक झाली. यामध्ये एका २१ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला. अपघातात ठार झालेली तरुणी सातारा नगरपालिकेची कर्मचारी होती.

गायत्री दीपक आहेरराव (वय २१, रा. शनिवार पेठ, सातारा) असे अपघातात ठार झालेल्या तरुणीचे नाव आहे. तर ओंकार लोखंडे (वय २४, रा. प्रतापगंज पेठ, सातारा) याच्यासह अन्य एकजण या अपघातात गंभीर जखमी झाला आहे. ओंकारला पुढील उपचारासाठी पुणे येथे नेण्यात आले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गायत्री आहेरराव ही तरुणी कारमधून कासवरून साताऱ्याकडे येत होती. याचवेळी साताऱ्याकडून कारमधून तीन तरुण कासकडे निघाले होते. या दोन्ही कारची यवतेश्वरजवळ भीषण धडक झाली. ही धडक इतकी जोरदार होती की, दोन्ही कारच्या पुढील बाजूचा अक्षरश: चक्काचूर झाला. यात गायत्री आहेरराव या तरुणीच्या डोक्याला तसेच हाता पायाला गंभीर जखम झाली. तर  ओंकार लोखंडे हा सुद्धा गंभीर जखमी झाला. 

या अपघाताची माहिती मिळताच शिवेंद्रसिंहराजे ट्रेकरचे जवान आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. चक्काचूर झालेल्या कारमधून गायत्रीला अथक प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात आले. त्यानंतर तिला तातडीने साताऱ्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. ओंकार लोखंडे याचीही प्रकृती चिंताजनक बनल्याने त्याला तातडीने पुणे येथे हलविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या अपघातप्रकरणी अनोळखी कार चालकावर सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार विशाल मोरे हे अधिक तपास करीत आहेत. 

एअर बॅग उघडूनही मृत्यू..

दोन्ही कारची भीषण धडक झाल्यानंतर एअर बॅग उघडल्या. मात्र, तरी सुद्धा गायत्रीचा मृत्यू झाल्याने पोलिसही अवाक् झाले आहेत. तिने सीट बेल्ट व्यवस्थित लावला होता की नाही, हे तपासानंतरच समजणार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. दोन्ही वाहने पोलिस ठाण्याच्या आवारात आणण्यात आली आहेत.

गायत्रीच्या वडिलांचाही पूर्वी अपघाती मृत्यू

गायत्रीचे वडील दीपक आहेरराव यांचेही काही वर्षांपूर्वी अपघाती निधन झाले आहे. त्यानंतर आता त्यांच्या मुलीचाही अपघातात मृत्यू झाल्याने साताऱ्यात हळहळ व्यक्त होत आहे. गायत्री ही काही वर्षांपूर्वी नगरपालिकेत नोकरीला लागली होती. अशा प्रकारे तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने तिच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 

Web Title: Fatal collision between two cars at Yavateshwar in Satara; Young woman killed; A serious one

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.