प्रगती जाधव-पाटील।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : फसवणुकीच्या गुन्ह्यात पोलिसांना गेले चार महिने पाहिजे असलेला संशयित सोमवारी खंडाळा पोलिसांना नकोसा झाला. दिवसभर खंडाळा पोलीस ठाण्यात बसून तो ‘साहेब मला अटक करा, मला अटक करा,’ अशी विनंती करीत होता. हवा असलेला संशयित अडचणीच्या प्रकरणातील महत्त्वाचा दुवा असल्याने त्याला अटक कशी करायची? या विचाराने पोलिसांची चांगलीच तंतरली. रात्री उशिरापर्यंत त्याला अटक झाली नव्हती.लाचखोरीचा आरोप असलेले फलटणचे उपअधीक्षक अभिजित पाटील यांच्या प्रकरणाशी संबंधित हा गुन्हा असल्याने पोलीस संशयिताला अटक करण्याचे धाडस दाखवेनात, अशी सोमवारी खंडाळा पोलीस ठाण्याच्या परिसरात दिवसभर चर्चा होती.‘मला अटक करा,’ असे पोलिसांना म्हणणारा वैभव धामणकर (रा. वाई) हा तो संशयित आहे. जानेवारीमध्ये धामणकर विरोधात खंडाळा पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. पैसे दामदुप्प्ट करून देतो, असे सांगून फसवणूक केल्याची फिर्याद रामदास जाधव यांनी खंडाळ्यात दि. २५ जानेवारी २०१९ मध्ये दिली आहे. हा गुन्हा दाखल झाल्यापासून धामणकर पोलिसांना हवा होता. सोमवारी तो स्वत:हून खंडाळा पोलिसांत हजर झाला. परंतु पोलीस त्याला अटक करण्याच्या मानसिकतेत नव्हते.फसवणुकीच्या गुन्ह्यात मध्यस्थीसाठी लाच मागितल्याने अडचणीत आलेले फलटणचे उपअधीक्षक अभिजित पाटील या गुन्ह्याशी संबंधित आहेत. सध्या ते वैद्यकीय कारणास्तव जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. धामणकर विरोधातील फसवणुकीच्या गुन्ह्याचा तपास पाटील यांच्याकडे होता. धामणकर यांच्या अटकपूर्व जामिनाचे अर्ज जिल्हा तसेच उच्च न्यायालयाने यापूर्वीच फेटाळले आहेत. त्यानंतर अभिजित पाटीलने लाच मागितल्याची तक्रार रामदास जाधव यांचे वकील राजकुमार चव्हाण यांनी दिल्याने अभिजित पाटील चांगलेच अडचणीत आले. फिर्यादीला स्वत:च्या गाडीत घालून पलायन, कागदपत्रे फाडणे, व्हॉईस रेकॉर्डची तोडफोड करण्यात आली होती.पोलिसांचीडोकेदुखी वाढणारलाचलुचपत प्रतिबंधक विभागाने उपअधीक्षकाविरुद्ध कायदेशीर प्रक्रिया सुरू केल्याने पाटील यांचा रक्तदाब वाढला. त्यांना रुग्णालयात दाखल व्हावे लागले. आता अभिजित पाटीलने वैद्यकीय कारणास्तव जामिनाची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर पैसे दुप्पट करून देतो म्हणून फसवणुकीच्या गुन्ह्यातील धामणकर याचे खंडाळा पोलिसांत हजर होणे अनेकांसाठी अडचणीचे ठरू शकते.धामणकरच्या अटकेने लाचखोरीच्या गुन्ह्यावर नव्याने प्रकाश पडणार आहे. तसेच या गुन्ह्याच्या तपासाला गती मिळण्याची शक्यता आहे. धामणकर यांचे पोलिसांना शरण जाणे खंडाळा व फलटण पोलिसांची डोकेदुखी वाढविणारे आहे.धामणकर याच्याकडे अधिक तपास झाल्यास फलटणच्या लाचखोरीच्या प्रकरणातील अनेक गोष्टींचा उलगडा होऊ शकतो. त्यामुळे पोलिसांना फसवणुकीच्या गुन्ह्यात हवा असलेला धामणकर सध्या फलटणच्या लाचलुचपतच्या केसमुळे त्यांना नकोसा झाला आहे.
फरारी संशयित म्हणतोय... साहेब मला अटक करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 11:59 PM