सातारा : खटाव तालुक्यातील कटगुण येथे आणखी काही कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाने पाहणी सुरू केली असून नमूने बर्ड फ्लूच्या तपासणीसाठी पाठविले आहेत. तर लोणंदमधील मृत कावळ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यातील अन्य काही अहवालांची प्रतीक्षा आहे.बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आतापर्यंत माण तालुक्यातील दोन गावांत तर खंडाळा आणि कऱ्हाड तालुक्यातील प्रत्येकी एका गावांत मृत कोंबड्या आढळून आल्या होत्या. यामधील खंडाळा तालुक्यातील मरिआईचीवाडीमधील कोंबड्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लूने झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले होते.
कऱ्हाड तालुक्यातील हणबरवाडी आणि माणमधील हिंगणी व बिदालमधील मृत कोंबड्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. असे असतानाच खटाव तालुक्यातील कटगुणमध्ये शनिवारी काही कोंबड्या मृत्यूमुखी पडल्याचे दिसून आले. तसेच त्यांच्या अंगावर वणही होते.
मुंगसाच्या हल्ल्यात या कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत होते. असे असतानाच रविवारी आणखी काही कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी कटगुणला पोहोचले. त्याठिकाणी अधिक माहिती घेत सर्वेक्षण सुरू केले. तसेच मृत कोंबड्यांचे नमूने बर्ड फ्लूच्या तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.दरम्यान, १० दिवसांपूर्वी लोणंद येथे मृत कावळे आढळले होते. या कावळ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह म्हणून आला आहे. पण, लोणंद परिसरातील मरिआईचीवाडीतील मृत कोंबड्यांचा अहवाल बाधित आल्यानंतर या परिसरातच संक्रमित झोन जाहीर करण्यात आला होता. तसेच सर्वेक्षण करुन उपाययोजना सुरू करण्यात आल्या होत्या.शिरवळ, तडवळेसह अन्य अहवालाची प्रतीक्षा...जिल्ह्यातील शिरवळ, भिलार, मलवडी आणि तडवळेमधील मृत कावळ्यांचे नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. या नमून्यांची प्रतीक्षा आहे. तर जावळी तालुक्यातील कुडाळमधील मृत कोंबड्यांचा अहवाल लवकरच प्राप्त होईल, अशी माहिती संबंधितांनी दिली.