माढ्याच्या उमेदवारीवरून टेंभुर्णीमध्ये खलबते..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2018 11:03 PM2018-11-04T23:03:45+5:302018-11-04T23:04:06+5:30
सातारा : लोकसभा निवडणुकीला अवधी असला तरी माढा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकीय चर्चांना ऊत आला आहे. त्यामुळेच यावेळी खासदार विजयसिंह ...
सातारा : लोकसभा निवडणुकीला अवधी असला तरी माढा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकीय चर्चांना ऊत आला आहे. त्यामुळेच यावेळी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील आणि फलटणचे रामराजे नाईक-निंबाळकर यांच्याविरोधात मोट बांधण्याचे काम सुरू झाले आहे. त्याची बैठक टेंभुर्णीत झाली असून, अकलूज आणि फलटणची दोन्ही घराणी सत्तेपासून दूर ठेवण्याचा निर्णय झाल्याची चर्चा आता माढा लोकसभा मतदार संघात सुरू झाली आहे.
माढा लोकसभा मतदारसंघ २००९ मध्ये अस्तित्वात आला. पहिल्यावेळी या मतदारसंघाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. तर दुसऱ्यावेळी राष्ट्रवादीचेच विजयसिंह मोहिते-पाटील हे निवडून आले; पण त्यांचा विजय हा सहजासहजी झाला नाही. कारण, त्यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेत असणारे व सध्याचे कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी त्यांना जेरीस आणले होते. अवघ्या काही हजार मतांच्या फरकाने मोहिते-पाटील यांचा विजय झाला आहे. आता तर माढा लोकसभा मतदारसंघासाठी अनेकजण इच्छुक आहेत. राष्ट्रवादीकडून विजयसिंह मोहिते-पाटील यांनी पुन्हा उमेदवारी मागितली आहे. तसेच माणमधील माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख हे ही राष्ट्रवादीकडून इच्छुक आहेत. तर अधूनमधून राज्य विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांचेही नाव पुढे येत आहे.
माढा लोकसभा मतदारसंघ आघाडीत राष्ट्रवादीकडे आहे. आताही हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पक्षाकडून अनेकजण निवडणूक लढविण्यास तयार आहेत. त्यातच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनीही फलटणमध्ये शनिवारी शरद पवार आणि पक्ष आदेश आल्यास कोणतीही निवडणूक लढविण्यास तयार असल्याचे स्पष्ट केले आहे. संजीवराजेंचे हे वक्तव्य नक्कीच माढा लोकसभा मतदारसंघासाठी असणार आहे. त्यामुळेच कदाचित मतदारसंघातील काहीजण अकलूज आणि फलटणकरांच्या विरोधात एकत्र येत आहेत. त्यासंदर्भातच शनिवारी टेंभुर्णी येथे सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांच्या फार्म हाऊसवर बैठक झाली. या बैठकीला सातारा जिल्ह्यातून आमदार जयकुमार गोरे, रणजितसिंह नाईक-निंबाळकर, सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील, बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत, माळशिरसचे उत्तमराव जानकर आदी उपस्थित होते.
टेंभुर्णीतील या बैठकीत अकलूजचे मोहिते-पाटील आणि फलटणच्या रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या विरोधात येण्याचा निर्णय झाल्याचे समजते. कसेही करून या घराण्यांना सत्तेपासून दूर ठेवण्याचाच निर्धारही झाल्याची चर्चा आहे.
जलाशयातल्या बोटीत संजयमामांचं सारथ्य
टेंभुर्णी येथे जयकुमार गोरे आणि रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना घेऊन संजय शिंदे हे तिथल्याच जलाशयावर गेले. तिथल्या बोटीत मस्त सफर करण्यात आली. या बोटीचं सारथ्य स्वत: मामांनी केलं. त्यानंतर अंधार झाला. त्यामुळे सर्वजण मामांच्या फार्म हाऊसवर आले. तोपर्यंत इतर आणखी काहीजण तेथे आले होते. या साºयांची गुप्त बैठक झाली. त्यावेळी माढ्यातून मोहिते-पाटील आणि रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या घराण्यातील कोणी का उमेदवार असेना; पण आपण त्यांच्या विरोधात एकच उमेदवार द्यायचा. पक्ष, चिन्ह नंतर ठरवू, असाही निर्णय झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.