याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी शेखर सिंह, प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, तहसीलदार योगेश्वर टोम्पे, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोकराव थोरात यांना देण्यात आले आहे. यावेळी मनसेचे तालुकाध्यक्ष गोरख नारकर, संजय सत्रे, राहुल संकपाळ, चंद्रकांत बामणे, अनिल कांबळे, संभाजी चव्हाण, समाधान खरात यांच्यासह मनसे पदाधिकारी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे, कऱ्हाड-चिपळूण महामार्गाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे. महामार्गाचे काम पूर्ण होण्यापूर्वीच अनेक ठिकाणी रस्त्याला तडे गेले असून, खड्डे पडले आहेत. कंपनीच्या अनागोंदी कारभारामुळे जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. नियोजनशून्य कारभारामुळे महामार्गाचे काम सुरू झाल्यापासून अनेकांचे नाहक बळी गेले आहेत.
महामार्गाचे काम मंजूर होऊन हे काम पूर्ण करण्याचा कालावधी ११ जुलै २०१७ ते १० जुलै २०१९ असा होता. मात्र, संबंधित विभागाने आणखी १९ महिन्यांचा कालावधी वाढवून कसा दिला? अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम अर्धवट सोडून ही कंपनी जात असेल, तर या कंपनीवर तत्काळ मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरेल, असेही निवेदनात म्हटले आहे.