सहकार पॅनेलच्या प्रचार सभेचे आयोजक संजय भगवान पवार व इंद्रजित हणुमंत कदम (दोघेही रा. रेठरे बुद्रूक, ता. कऱ्हाड) व संस्थापक पॅनेलच्या सभेचे आयोजक सुरेश ऊर्फ सुभाष बाबूराव पाटील, सतीश वसंत यादव व श्रीकांत राजाराम देवकर (सर्व रा. वाठार, ता. कऱ्हाड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी कडक निर्बंध घालून दिले आहेत. शनिवार व रविवारी वीकेंड लॉकडाऊन आहे. या कालावधीत विनाकारण बाहेर फिरण्यास मनाई करण्यात आली असून, जिल्ह्यात जमावबंदीचा आदेशही लागू आहे. असे असताना या आदेशाचा भंग करून रविवारी रेठरे बुद्रूक येथे जयवंतराव भोसले सहकार पॅनेलने प्रचारार्थ सांगता सभेचे आयोजन केले होते. त्या सभेमध्ये सुमारे ८०० ते ९०० लोक जमा होते. जमलेल्या लोकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले नसल्याचे दिसून आल्यामुळे आयोजक संजय पवार व इंद्रजित कदम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची तक्रार तलाठी विशाल प्रताप पाटील यांनी ग्रामीण पोलिसात दिली आहे.
वाठार येथे संस्थापक पॅनेलने रविवारी सायंकाळी साडेसहा वाजता सांगता सभेचे आयोजन केले होते. त्या सभेमध्ये ७०० ते ८०० लोक जमा होते. तेथेही सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले नाही. त्यामुळे आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची तक्रार तलाठी दादासाहेब भीमराव कणसे यांनी ग्रामीण पोलिसात दिली आहे.