मायदेशी बांधवांसाठी परदेशातून आर्थिक सहाय्य ...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:40 AM2021-05-06T04:40:45+5:302021-05-06T04:40:45+5:30
खंडाळा : ‘घार उडे आकाशी, चित्त तिचे पिल्लापाशी’ अशीच काहीशी अवस्था कोरोनाच्या काळात पहायला मिळत आहे. नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने ...
खंडाळा : ‘घार उडे आकाशी, चित्त तिचे पिल्लापाशी’ अशीच काहीशी अवस्था कोरोनाच्या काळात पहायला मिळत आहे. नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने परदेशी असणाऱ्या लोकांचे लक्ष मात्र मायदेशातील आपल्या बांधवांकडे असल्याचे दिसून येते.
खंडाळा तालुक्यातील अंदोरी गावात कोरोनाचा मोठा प्रसार झाला असून, गाव कोरोनामुक्त करण्यासाठी सर्वच यंत्रणा अहोरात्र झटत आहे. कोरोनाग्रस्त लोकांना औषधे व उपचाराच्या सुविधा मिळाव्यात यासाठी दुबई येथील डाॅ. आंबेडकर मिशनने ५० हजारांची मदत पाठविली आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आरोग्य विभागाच्या सहकार्याने अंदोरी ग्रामपंचायत व आपत्ती व्यवस्थापन समितीने प्राथमिक शाळेत विलगीकरण कक्ष सुरू करून अल्प लक्षणे असलेल्या रुग्णांची व्यवस्था या ठिकाणी केली आहे. या विलगीकरण कक्षातून ३२ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. कोरोनाबाधित कुटुंबांना अत्यावश्यक साहित्य व औषध उपचारासाठी अंदोरी गावचे दुबईस्थित सुपुत्र लालासो खुंटे यांच्या प्रयत्नांतून दुबईच्या डाॅ. आंबेडकर मिशनने ५० हजारांची मदत केली आहे. या मदतीतून कोरोना बाधित रुग्णांसाठी लागणाऱ्या औषधाची किट उपलब्ध करण्यात आली. डॉ. नानासो हाडंबर यांच्या हस्ते प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पल्लवी निगडे यांच्याकडे सुपुर्द करण्यात आली. यावेळी नानासो ननावरे, सरपंच प्रदीप होळकर, उपसरपंच छाया हाडंबर, दत्तात्रय धायगुडे, बाळासो होवाळ, नामदेव ननावरे, ग्रामविकास अधिकारी रवींद्र धायगुडे, बाळासो वाघमारे, दादा खुंटे, ज्ञानेश्वर ससाणे आदी प्रमुख उपस्थित होते.
०५खंडाळा
अंदोरी (ता. खंडाळा) येथे दुबई येथील डाॅ. आंबेडकर मिशनने ५० हजारांची मदत पाठविली आहे.