अंधाच्या बोटांतून उमटले सप्तसुरांचे तराणे!
By admin | Published: October 14, 2015 10:18 PM2015-10-14T22:18:37+5:302015-10-15T00:32:57+5:30
प्रेरणादायी जगणं : नाटोशी येथील अंध अरविंद पवार यांना लाभलंय विविध कलांचं देणं--अंध सहायता दिन विशेष
प्रवीण जाधव -- नाटोशी अवयवांची विकलांगता असून त्याचा बाऊ न करता आनंदी आयुष्य जगणारी अशी अनेक माणसं आपल्या आजूबाजूला आहेत की जी समाजमनाला कणखर बनवितात. जगण्याची दृष्टी देत असतात. आंब्रग येथील अंध अरविंद पवार याचं जगणंही प्रेरणादायी ठरावं असंच आहे. दृष्टी नसूनही ते तबला, पेटी, बेन्जो, बासरी ही वाद्ये एवढी उत्तम वाजवितात. त्यांच्या जादूई बोटांतून जणू सप्तसुरांचे गाणे उमटते. आपल्याकडे जे नाही त्याची तार छेडत बसण्यापेक्षा आयुष्याचं जीवनगाणं बनविण्याची त्यांची जिद्द प्रेरणादायी अशीच आहे.
पाटण तालुक्यातील आंब्रग हे छोटसं गाव. या गावात अरविंद महादेव पवार हे आपल्या कुटुंबासह राहतात. अरविंद जन्मताच अंध. अरविंदची पत्नी दुर्गा हीदेखील जन्मजात सत्तर टक्के अंध आहे़ घरी आई, वडील, दोन मुली आहेत़ पोटापुरता जमीनजुमला़ कष्टाची भाकर खाऊन हे कुटुंब सुखानं जगतंय.
अरविंदचं आंब्रग येथे छोटसं दुकान आहे़ तेच त्यांच्या उदरनिर्वाहाचं साधन आहे. एक खास गोष्ट अशी की, तो अंध असूनही मोबाईल रिचार्ज करतो़ तुम्ही तुमचा नंबर सांगायचा वैशिष्ट्य असे की, आजपर्यंत कोणाचाही नंबर चुकलेला नाही़
याशिवाय अरविंदला अनेक कला अवगत आहेत़ टोपल्या वळणे, दोऱ्या वळणे हासुध्दा व्यवसाय तो पोटासाठी करतो़ त्याने बनविलेल्या टोपल्या, दोऱ्यांची वीण अतिशय वेगळी असते. त्यांची ही कला ही खरोखर दृष्ट लागण्यासारखी आहे़
अंध माणसांना येणाऱ्या अडीअडचणी तो जाणतो. आपल्यासारखीच इतरांची अवस्था नको़ अंध, अपंग व्यक्तींनी दुसऱ्यावर अवलंबून राहता कामा नये, ही त्यांची अपेक्षा त्यामुळे त्याने संतकृपा सामाजिक सेवा संस्था स्थापन केली आहे़ या संस्थेच्या माध्यतातून अंध, अपंगाना मदत करण्याचे काम तो करीत आहे़
आंब्रग, नाटोशी, मोरगिरी, बेलवडे शिरळमारूल आदी ठिकाणी त्याने आजपर्यंत 20 नेत्र तपासणी शिबिर घेतली आहेत़
उदरनिर्वाहाचे साधन जळाले; पण कुणी नाही पाहिले!
एकंदरीत अरविंदचा संसार व्यवस्थित चालला होता; पण ‘दैव जाणिले कुणी’ या उक्तीप्रमाणे ४ आॅक्टोबर रोजी पहाटे त्यांच्या दुकानास शॉर्टसर्किटमुळे आग लागली आणि त्यामध्ये फ्रिज, पंखा व इतर साहित्यासह सुमारे तीस हजार रूपयांचे नुकासान झाले. बातमी प्रसिद्ध झाली. पंचनामा झाला; पण शासकीय मदत काहीच नाही़ प्रशासकीय अधिकारी आणि तालुक्यातील नेतेमंडळींनी भेट देण्याची औपचारिकताही दाखविली नाही. आधार सेवा संस्थेने मदतीचे आश्वासन दिले आहे़