अंध पती-पत्नीच्या दुकानास आग
By admin | Published: October 4, 2015 09:14 PM2015-10-04T21:14:58+5:302015-10-05T00:15:34+5:30
आंब्रग येथील घटना : ५० हजारांचे नुकसान
पाटण : पती-पत्नी दोघांनाही शंभर टक्के अंधत्व म्हणून घरबसल्या उदरनिर्वाहाचे साधन म्हणून किराणा मालाचे दुकान उभे केले होते. मात्र, नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. रविवारी पहाटेच्या सुमारास आंब्रग, ता. पाटण येथील या अंध पती-पत्नीच्या किरणा दुकानात शॉकसर्किटमुळे आग लागली आणि क्षणातच होत्याचं नव्हतं झालं.या आगीत दुकानातील फ्रिज, पंखा, बिस्किट पुडे, खारी टोस्ट, जवळपास ७० किलोच्या डाळी, अंडी असे मिळून ५० हजारांचे साहित्य भस्मसात झाले. अंध पती-पत्नी अरविंद आणि दुर्गा पवार हे दोघेजण गेल्या सात वर्षांपासून हे दुकान चालवित होते. या घटनेमुळे आंब्रगसह मोरणा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अंध अरविंद पवार यांना या प्रसंगातून सावरण्यासाठी आता आर्थिक मदतीचा हातभार देण्याची गरज निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)