दहिवडी : दहिवडी नगरपंचायतीच्या इमारतीला रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास अचानक आग लागली. यामध्ये दहा लाखांहून जास्त रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. आगीत काही कागदपत्रे, संगणक, फर्निचर, खुर्च्या, कपाट, वायर, झेराॅक्स मशीन जळून खाक झाले. शेजारीच असलेल्या दूध डेअरीतील पाण्याने कर्मचारी व नागरिकांनी अर्ध्या तासात आग विझविली.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, नगरपंचायतीचे कार्यालय रविवारी सुटी असल्याने बंद होते. सकाळी साडेनऊच्या सुमारास कार्यालयातून धूर येऊ लागला. नगरपंचायतीचे कार्यालय मुख्य रस्त्याच्या जवळच असल्याने रस्त्यावरून जाणारे नागरिक तसेच नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना इमारतीतून धूर येत असल्याचे दिसले. त्यानंतर दहाच्या सुमारास वीज वितरण कंपनीला या घटनेची माहिती देऊन विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला. शेजारीच दूध डेअरी असल्याने तेथे दुधाच्या कॅनमध्ये पाणी होते. त्याच्या साहाय्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. त्यातच ही इमारत तोकडी असल्याने दाटीवाटीने सर्व साहित्य ठेवलेले होते.
शाॅर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज असला तरी, बांधकाम विभागाच्या काही फाईल भस्मसात झाल्या. यामुळे उलटसुलट चर्चा रंगू लागली आहे. मुख्याधिकारी चार दिवस रजेवर आहेत. याशिवाय रविवारी सुटीदिवशी आग लागली. तसेच बांधकाम विभागाच्या फायली जळाल्याने या घटनेच्या मुळापर्यंत जाणे गरजेचे आहे, अशी मागणी होत आहे.
या घटनेनंतर दहिवडीचे सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ, नगरपंचायतीचे अधीक्षक निकम, नगराध्यक्ष धनाजी जाधव, उपनगराध्यक्ष नीलम शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याबाबत दहिवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
चौकट
अग्निशमन दलाची उणीव
दहिवडी नगरपंचायतीकडे स्वत:चे अग्निशमन दल नाही. दुर्घटना घडल्यास कोणतीही यंत्रणा नसल्याने म्हसवडच्या बंबावर अवलंबून राहावे लागते. याची उणीव रविवारी भासली.
फोटो १४दहिवडी-फायर
दहिवडी नगरपंचायतीच्या इमारतीला रविवारी सकाळी आग लागली. हे समजल्यावर कर्मचाऱ्यांसह नागरिकांनी धाव घेऊन आग विझविली. (छाया : नवनाथ जगदाळे)