प्रगती जाधव-पाटीलसातारा - वारंवार वणवे लागल्याने जमिनीच्या पाणी धारण क्षमतेवर मर्यादा येत आहेत. याबरोबरच निसर्गाच्या सानिध्यात घरकुल बांधताना डोंगर उतारावरील जागांचे होणारे सपाटीकरण हे वाढत्या भुस्खलनाचे महत्वपूर्ण कारण असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. जिल्ह्यात दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसाने पाटण, वाई महाबळेश्वर परिसरात २० हून अधिक गावांमध्ये भुस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. लिंगमळा धबधब्याकडे जाणारा रस्ता उभा चिरला गेलाय तर बहुतांश ठिकाणी पानगळ व्हावी असे कडे कोसळू लागले आहेत. पावसाच्या या तांडवाने किमान तीस जणांचा मृत्यू झालाय तर कोट्यावधी रूपयांचे वित्तीय हानी झाली आहे.
निसर्गाच्या या प्रकोपात मानवी हस्तक्षेपाचा मोठा भाग असल्याचे जिल्ह्यातील या दुर्घटनांमधून पुढे आले आहे. जानेवारी ते मे या पाच महिन्यांमध्ये केवळ गंमत म्हणून अनेकांनी वनक्षेत्राला वणवा लावला. जिथं माणूस पोहोचत नाही, तिथेही आगीच्या ज्वाला पोहोचल्या आणि मातीचा वरील थर पूर्णपणे भुसभुशीत केला. त्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरण्याऐवजी माती घेऊनच खाली घसरू लागले, त्यामुळे पाण्याच्या मुख्य प्रवाहात डोंगरातील माती वाहून आली आणि ठिकठिकाणी या मातीनेच पाणी आडवून ठेवले.
शहराच्या प्रदुषणापासून दूर निसर्गाच्या सानिध्यात स्वत:चे भव्यदिव्य ‘विला’ बांधण्यासाठी डोंगर उतारावरील जमिनींचे झालेले सपाटीकरणही या घटनांमागील महत्वाचे कारण ठरत आहे. नैसर्गिकरित्या पाणी वाहून नेण्यासाठी उपलब्ध असलेल्या जागा सपाट झाल्याने पावसाचे हे पाणी मिळेल त्या दिशेने वाहत आहे. परिणामी घरांचे बांधकाम करताना इमारतीचा पाया मजबूत होतोय पण डोंगर ढिसूळ होतोय याकडे दुर्लक्ष होत आहे.
मानवी विकासाची पहिली कुऱ्हाड निसर्गावर पडतेय, असं म्हणतात. मानवाच्या चुकीमुळे होणारे हे नुकसान अनेक कुटूंबांना उध्दवस्त करतंय. चुक कोणाची याहीपेक्षा भविष्यात हे होऊ नये यासाठी प्रयत्न पूर्वक उपाययोजना जागल्याच्या भूमिकेतून प्रशासनाने करावी, अशी अपेक्षा यानिमित्ताने व्यक्त होत आहे.आपत्ती व्यवस्थापनाचा गृहपाठच नाही!
जिल्हाधिकारी कार्यालयात अस्तित्वात असलेले आपत्ती व्यवस्थापन विभागाने यापूर्वीही आणि आत्ताही आपला गृहपाठच केला नसल्याचे समोर आले आहे. गेल्या दोन पावसांचा अनुभव, जिल्ह्यातील डोंगर उतारावरील गावे यासह तिथल्या भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून प्रतिबंधात्मक उपाय करण्याचा विचारच या विभागाकडून होत नाही. आपत्ती आल्यावर धावधाव करण्यापेक्षा ती येऊ नये यासाठी आवश्यक तयारी आणि खबरदारी घेण्याचीही सवड या विभागाला नाही, हे या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.गेल्या दोन वर्षांत जिल्ह्यात वणव्यांची संख्या वाढली आहे. आगीच्या भक्ष्यसथानी गेलेल्या डोंगरांमुळे वनअच्छादन क्षेत्र कमी झालं. या भागातील तांबड्या मातीची पाणी धारण क्षमता कमी आहे, त्यात मानवी हस्तक्षेपामुळे पाण्याचे डोंगर उतारावरील नैसर्गिक प्रवाह बदलल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
- सुनिल भोईटे, मानद वन्यजीव रक्षक, सातारा