तळमावले : दुर्गम वाल्मिक पठारावरील असवलेवाडी (ता. पाटण) येथील ग्रामपंचायतीच्या पन्नास वर्षांच्या कारकीर्दीत सरपंचपदी विराजमान होण्याचा बहुमान प्रथमच एका महिलेला मिळाला आहे. तेथील सरपंचपदी मनीषा अशोक असवले, तर उपसरपंचपदी विलास शंकर असवले यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली आहे. असवलेवाडीत गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीबाबतचा निर्णय ग्रामदैवत पावनाई देवीच्या मंदिरात एकत्र जमून घेण्याची जुनी परंपरा आहे. गत पंचवार्षिकचा अपवाद वगळता आतापर्यंतच्या गावातील निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. येथील ग्रामपंचायतीची सदस्य संख्या सात आहे. मनीषा असवले, विलास असवले, भाऊसाहेब ताईगडे, वैशाली असवले, विमल कंक या पाच सदस्यांची निवड करण्यात आली. आरक्षित प्रवर्गातील दोन उमेदवार उपलब्ध न झाल्याने त्या जागा रिक्त राहिल्या. सरपंचपद सर्वसाधारण महिला उमेदवारासाठी आरक्षित होते. नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत सरपंचपदी मनीषा असवले, तर उपसरपंचपदी विलास असवले यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
नवनिर्वाचित सदस्यांचा माजी सरपंच रामचंद्र असवले, निवृत्त पोलीस पाटील कृष्णत असवले, तुकाराम असवले, गणपती असवले, धनाजी असवले, विठ्ठल असवले, जयवंत असवले, शंकर काळे, नाथाजी असवले, शंकर असवले, सीताबाई असवले उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पवार यांनी काम पाहिले.