पाच दिवसांत पाचजणांचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 09:07 AM2021-02-05T09:07:12+5:302021-02-05T09:07:12+5:30
वेळे : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका संपायचे नावच घेत नाही. सलग पाच दिवसांमध्ये पाच अपघात झाले असून यामध्ये ...
वेळे : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका संपायचे नावच घेत नाही. सलग पाच दिवसांमध्ये पाच अपघात झाले असून यामध्ये पाचजणांचा मृत्यू झाला आहे. सातारा लेनवर असलेल्या तीव्र उतारावर पुढे चालणाऱ्या मालट्रकला पाठीमागून दिलेल्या जोरदार धडकेत म्हसवे येथील २५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर पाठीमागे बसलेल्या २३ वर्षीय युवकास किरकोळ दुखापत झाली आहे. या अपघाताची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात झाली आहे.
पोलिसांकडून मिळालेली याबाबतची माहिती अशी की, म्हसवे येथील रहिवासी असलेले अक्षय सदाशिव शिर्के (२५) व त्याच्या पाठीमागे दुचाकीवर बसलेला गणेश उर्फ नंदू विनायक शिर्के (२३, दोघेही रा. आसवली, ता. खंडाळा) येथील कंपनीमध्ये नोकरीस होते. ते बुधवार, दि. २७ जानेवारी रोजी सायंकाळी साडेसहा ते सकाळी साडेसहा अशी ड्युटीवर होते. गुरुवार, दि. २८ रोजी सकाळी ड्युटी संपवून अक्षय शिर्केच्या दुचाकीवरून (एम.एच. ११ बीडब्ल्यू ०८३७) म्हसवेकडे निघाले होते. त्यांची दुचाकी पुणे-सातारा या महामार्गावरून सकाळी सव्वा आठच्या सुमारास खंबाटकी घाट चढून वेळे हद्दीत घाट रस्त्याच्या तीव्र उतारावर आली असता पुढे जाणाऱ्या वाहनाने कदाचित अचानकपणे ब्रेक लावल्याने दुचाकीस्वार वाहनावर आदळला. यामध्ये या झालेल्या भीषण अपघातात चालक अक्षय शिर्के याच्या डोक्यातील हेल्मेटचे तुकडे होऊन त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली. अतिरक्तस्त्रावामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला तर पाठीमागे बसलेला गणेश उर्फ नंदू शिर्के हा किरकोळ जखमी झाला. या अपघाताची माहिती भुईंज पोलीस ठाण्याचे हवालदार चंद्रकांत मुंगसे, विजय अवघडे, मंदार शिंदे आणी पोलीस चालक किर्दक या सर्वाना मिळताच ते तातडीने घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी पंचनामा केला.
तत्पूर्वी सातारा-पुणे महामार्गावरील आनेवाडी टोलनाका येथे झालेल्या भीषण अपघातात वसंत मारुती गोरे ( ७२, रा. आनेवाडी, ता. जावली) हे महामार्ग ओलांडत असताना चारचाकी वाहनाने जोराची धडक दिली. यातच त्यांचा मृत्यू झाला होता तर ज्ञानेश्वर बाजीराव शिवथरे (७५, रा. कळंबे ता. वाई) हे शनिवार २३ रोजी भुईंज आठवडा बाजारातून पत्नीसह भाजीपाला खरेदी करून दोघेही आपल्या दुचाकीवरून कळंबे या गावाकडे जात असताना भुईंज येथील कृष्णा नदीच्या पुलावर पाठीमागून येणाऱ्या दुचाकीने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या या अपघातात ज्ञानेश्वर शिवथरे यांचा जागीच मृत्यू झाला. वाई येथील कृष्णा नदीवर असलेल्या भद्रेश्वर पुलाच्या मध्यभागी ग्रीटने भरलेल्या डंपरने दुचाकीवर पुढे जात असलेल्या कमल सुरेश सोनावणे रा. ओझर्डे ता. वाई यांना धडक देऊन रस्त्यावर पडल्यावर ५० फूट फरफटत नेले. यामध्ये त्यांचाही मृत्यू झाला.