वन्यप्राण्यांसाठी जंगलात बांधले पाणवठे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:40 AM2021-04-09T04:40:36+5:302021-04-09T04:40:36+5:30
निवी परिसरात वन्यप्राण्यांचा मोठा उपद्रव असतो. ऊन्हाळ्यात हा उपद्रव वाढतो. पाण्याच्या शोधात प्राणी जंगलाबाहेर पडतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान ...
निवी परिसरात वन्यप्राण्यांचा मोठा उपद्रव असतो. ऊन्हाळ्यात हा उपद्रव वाढतो. पाण्याच्या शोधात प्राणी जंगलाबाहेर पडतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान होते. तसेच हल्ला होण्याची भीतीही असते. हा उपद्रव रोखण्यासाठी बंधारे व तळ्याच्या माध्यमातून ग्रामस्थांनी जंगलातच वन्यप्राण्यांच्या पाण्याची सोय केली आहे. सकाळी आठ वाजता येथील ग्रामस्थ जेवण, टिकाव, खोरे, पाट्या आदी साहित्य सोबत घेऊन श्रमदानासाठी घराबाहेर पडले. गावापासून दीड किलोमीटरवर असलेल्या जंगलातील झऱ्याजवळचे पाण्याचे बुजलेले नैसर्गिक स्त्रोत त्यांनी रिकामे केले. ओढ्याचे खोलीकरण करून त्यावर वाळू-माती भरलेली सिमेंटची पोती रचून तसेच दगड व चिखल वापरून दोन वनराई बंधारे आणि एका तळ्याचे बांधकाम केले. दुपारी अर्धा तास जेवणासाठी सुटी करून सायंकाळपर्यंत श्रमदान सुरू होते.
सहायक वनसंरक्षक किरण कांबळे, वनक्षेत्रपाल विलासराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल सुभाष राऊत, वनरक्षक जयवंत बेंद्रे, धनाजी पवार, वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मारुती ऊर्फ बाळू पाटील, अंकुश पवार, विठ्ठल पाटील, अशोक साबळे, तुकाराम साबळे, सयाजी साबळे, मारुती साबळे, बाळू साबळे, ईश्वर कदम, सुरेश कदम, बबन साबळे, सतीश साबळे, ज्ञानदेव साबळे आदींनी श्रमदानात सहभाग घेतला.
- चौकट
चार वर्षांपासून बंधाऱ्यांची निर्मिती
जंगलातील पाणवठ्याची सफाई केल्यावर वन्यप्राणी पाण्यासाठी जंगलाबाहेर पडत नाहीत. त्यांचा उपद्रव कमी होतो, असा निवीतील ग्रामस्थांचा अनुभव आहे. गत चार वर्षांपासून ते वन्यप्राण्यांसाठी पाणवठे तयार करत आहेत. जंगलातच पाण्याची तजवीज झाल्याने प्राण्यांची मनुष्य वस्तीतील धाव थांबण्यास मदत होणार असल्याचे वनपाल सुभाष राऊत व वन व्यवस्थापन समिती अध्यक्ष मारुती पाटील यांनी सांगितले.
फोटो : ०८केआरडी०२
कॅप्शन : निवी, ता. पाटण येथील ग्रामस्थांनी वन्यप्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, यासाठी श्रमदानातून जंगलात पाणवठ्यांची निर्मिती केली आहे. (छाया : बाळासाहेब रोडे)