सातारा : जिल्हा रुग्णालयात गरोदर माता मृत्यूचे प्रमाण आटोक्यात आणण्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांना यश आले असून, वर्षभरात चार मातांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एक एचआयव्हीग्रस्त आणि दोन कोरोनाबाधित मातांचा समावेश आहे.
जिल्हा रुग्णालयात रोज चार ते पाच माता प्रसूतीसाठी येत असतात. या मातांची प्रसूती होईपर्यंत परिचारिका आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांना जागरुक राहावे लागते. प्रसूतीदरम्यान अतिरक्तस्त्राव किंवा वाढत जाणारा रक्तदाब हे बऱ्याचदा माता दगावण्याचे महत्त्वाचे कारण ठरतात. माता मृत्यूंचे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रसूतीसाठी रुग्णालयात आलेल्या मातेची काळजी घेतली जाते. औषधोपचारांबरोबरच चोवीस तास तज्ज्ञ डाॅक्टरांची टीम सतर्क असते. त्यामुळे मातेची प्रकृती अचानक गंभीर झाली तरी योग्य व तातडीने उपचार केल्यामुळे माता दगावण्याचे प्रमाण जिल्हा रुग्णालयात कमी आहे. गत वर्षभरात चार मातांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये एक माता प्रसूतीपूर्वीच एचआयव्हीबाधित होती. या मातेची प्रतिकारशक्ती प्रचंड खालावलेली होती, त्यामुळे प्रसूतीदरम्यान रक्तस्त्राव झाल्याने त्या मातेचा मृत्यू झाला. तसेच प्रसूतीदरम्यान दोन कोरोनाबाधित माता होत्या, त्यांचाही यात बळी गेला तर एक मातेचा प्रसूतीदरम्यान रक्तदाब वाढल्यामुळे मृत्यू झाला. कोरोना काळात मातांना सुरक्षित ठेवण्यासाठी रुग्णालयातील कर्मचारी आणि डाॅक्टरांनी चांगले प्रयत्न केले. त्यामुळे माता दगावण्याचे प्रमाण आटोक्यात आणण्यात यश आले.
चाैकट : सप्टेंबरमध्ये कोरोनाचा कहर...
सातारा जिल्ह्यात कोरोनाने सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक कहर केला. दररोज चाळीसजणांचा कोरोनामुळे मृत्यू होत होता. यावेळी सर्वाधिक धोका हा गरोदर मातांना होता. जिल्हा रुग्णालयात या मातांसाठी स्वतंत्र वाॅर्ड तयार करण्यात आला होता. या वाॅर्डमध्ये बाहेरील कोणालाही सोडले जात नव्हते. त्यामुळे मातांना संसर्ग झाला नाही. परिणामी सप्टेंबर महिन्यात मृत्यूचे प्रमाण दोनवर स्थिर ठेवण्यात डाॅक्टरांना यश आले.
चाैकट : माता मृत्यूसाठी रक्तदाब सर्वात मोठे कारण
प्रसूती होण्यापूर्वी मातेचा रक्तदाब नाॅर्मल असायला हवा. अनेकदा भीतीपोटी रक्तदाब वाढतो. तसेच काहीवेळेला योग्यप्रकारे औषधोपचार न झाल्यामुळेही रक्तदाब वाढतो. प्रसूतीदरम्यान जर रक्तदाब वाढला तर माता आणि बाळही दगावण्याची शक्यता असते.
कोट : रक्तदाब वाढू नये म्हणून प्रसूतीपूर्वी योग्यप्रकारे काळजी घेणे गरजेचे आहे. योग्यप्रकारे तपासणी, आहार आणि औषधे घेतल्यास रक्तदाब नाॅर्मल राहू शकतो. त्यामुळे मातांनी प्रसूतीपूर्वीच आहार तसेच हलक्या व्यायामावर भर द्यावा.
- डाॅ. सुधीर कदम, स्त्रीरोग तज़्ज्ञ, जिल्हा रुग्णालय, सातारा