चार व्यावसाईक कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:40 AM2021-04-09T04:40:40+5:302021-04-09T04:40:40+5:30
व्यापारी व व्यावसायिकांमार्फत कोरोना संसर्ग वाढू नये, या उद्देशाने सणबूर ग्रामपंचायतीच्या वतीने व्यावसायिकांची सरसकट कोरोना चाचणी करण्यात आली. ...
व्यापारी व व्यावसायिकांमार्फत कोरोना संसर्ग वाढू नये, या उद्देशाने सणबूर ग्रामपंचायतीच्या वतीने व्यावसायिकांची सरसकट कोरोना चाचणी करण्यात आली. उपसरपंच संदीप जाधव यांनी पुढाकार घेऊन कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले. सणबूर येथे पंधरा दिवसांपासून कोरोना रुग्ण सापडत आहेत, तर किराणा दुकानदार, छोटे-मोठे भाजीपाला विक्रेते, मटन-चिकन विक्रेते, हॉटेल, सलून व्यावसायिक कोरोनाचे सुपर स्प्रेडर ठरण्याची शक्यता असते. त्यामुळे व्यावसायिकांची कोरोना आरटीपीसीआर चाचणी करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीच्या सूचनेनुसार घेण्यात आल्या. ५ एप्रिल रोजी सळवे प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत डॉ. राहुल बने यांच्या मार्गदर्शनाखाली या चाचण्या घेण्यात आल्या. दुसऱ्या दिवशी त्याचा अहवाल प्राप्त झाला. त्यामध्ये चार व्यावसायिकांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने ग्रामस्थांंमध्ये घबराट पसरली आहे.
एक हॉटेल व्यावसायिक, दोन सलून व्यावसायिक व एक कापड व्यावसायिक असे चौघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, तर सणबूर येथे खरेदीसाठी येणाऱ्या रूवले, उधवणे, तामिणे, पाणेरी, बाचोली, महिंद, सळवे व पाळशी या गावांतील ग्रामस्थांमध्येही चिंतेचे वातावरण आहे.
- चौकट
चाचणी झाल्याशिवाय व्यवसाय नाही!
सळवे प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत सणबूर येथे चाचण्या घेण्यात आल्या. त्यावेळी काही व्यावसायिक बाहेरगावी गेल्याने त्यांच्या चाचण्या होऊ शकल्या नाहीत. मात्र, कोरोना चाचणी झाल्याशिवाय त्यांना दुकाने किंवा व्यवसाय करता येणार नाही, अशी कडक सूचना ग्रामपंचायतीने दिली आहे. अजूूनही काही व्यावसायिकांच्या कोरोना चाचण्या घेण्याचे बाकी आहे.