अश्लील व्हिडीओ दाखवून चार लग्न मोडली, साताऱ्यातील दोघांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 01:34 PM2018-07-18T13:34:59+5:302018-07-18T13:40:11+5:30
जबरदस्तीने अश्लील व्हिडीओ शूटिंग करून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली असून, संबंधित युवकाने पीडित मुलीची यापूर्वी तब्बल चार लग्न अश्लील व्हिडीओ दाखवून मोडली.
सातारा : जबरदस्तीने अश्लील व्हिडीओ शूटिंग करून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली असून, संबंधित युवकाने पीडित मुलीची यापूर्वी तब्बल चार लग्न अश्लील व्हिडीओ दाखवून मोडली. एवढेच नव्हे आता सासरच्या लोकांनाही हा व्हिडीओ पाठविण्याची त्याने धमकी दिली.
या साऱ्या त्रासाला कंटाळून अखेर पीडित युवतीने शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन पोलिसांसमोर आपबिती सांगितली. अशोक यादव, शिवाजी यादव (रा. खिंडवाडी, ता. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, साताऱ्यातील एका कंपनीत काम करत असताना अशोक यादव याच्याशी युवतीशी ओळख झाली. तो तिला आॅफिस सुटल्यानंतर जबरदस्तीने दुचाकीवर घरी सोडत होता. एके दिवशी ती घरी एकटीच असताना अशोकने तिच्या घरात प्रवेश करून तिच्यावर जबरदस्ती केली. त्याचे त्याने व्हिडीओ शूटिंग केले.
काही दिवसानंतर तिने अशोकसोबत बोलणे बंद केल्यानंतर त्याने मोबाईलवर कॉल करून शरीरसुखाची मागणी केली. त्यास तिने नकार दिल्याने त्याने काढलेल्या व्हिडीओ तिच्या व्हॉटसअॅपवर पाठवून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. त्याने साताऱ्यातील लॉजवर तिच्यावर अत्याचार केला.
दरम्यान, तिचे लग्न ठरले असता त्या मुलांना व्हिडीओ पाठवून आमचे शारीरिक संबंध
आहेत, असे सांगून त्याने तिचे चार लग्न मोडली. अशाप्रकारे अशोक गेल्या अनेक वर्षांपासून तिचा पाठलाग करत तिला जीवे मारण्याची तसेच व्हिडीओ सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देत तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार करत होता.
तसेच व्हिडीओ डिलिट करण्यासाठी १० लाख रुपयांची मागणी केली. ते देण्यास नकार दिल्यानंतर हा व्हिडीओ पती व सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. याबाबतची तक्रार विवाहितेने सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली. अधिक तपास पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर करीत आहेत.