सातारा: चौदा वर्षांच्या बालिकेचे अपहरण करून कान व नाकातील दागिने काढून घेण्याचा प्रकार सोमवारी रात्री शाहूपुरी परिसरात उघडकीस आला. याबाबत संबंधित मुलगी व तिच्या नातेवाइकांकडे पोलीस चौकशी करत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, संबंधित मुलगी व तिची लहान बहीण सोमवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास वडिलांसोबत घराजवळील मैदानात फिरायला निघाले होते. या वेळी मी बाथरूमला जाऊन येते तुम्ही पुढे जा, असे ती मुलगी वडिलांना म्हणाली. त्यामुळे वडील दुसऱ्या मुलीसोबत फिरायला गेले. अर्ध्या तासाने ते घरी आले. यावेळी मुलगी घरात नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर वडिलांनी याबाबतची माहिती परिसरातील नागरिकांना दिली. व्हाॅट्सअप ग्रुपवरूनही ही माहिती देण्यात आली. त्यामुळे थोड्याच वेळात तेथे दोनशे ते अडीचशे लोक जमा झाले. माजी उपनगराध्यक्ष किशोर शिंदे व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळासाहेब गोसावी यांच्यासह काही लोकांनी बॅटरी व काठ्या घेऊन परिसरातील झोपडपट्यांमध्येही मुलीचा शोध घेतला.
रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू होती. यादरम्यान पहाटे एकच्या सुमारास शाहूपुरी राहणारी एक व्यक्ती दुचाकीवरून मेढ्यावरून आंबेदरे रस्त्याने साताऱ्याकडे येत होती. शाहूपुरी चौकाच्या अलीकडे संबंधित मुलगी त्यांना चालत जाताना दिसली. त्यांनी तिला माहिती विचारून घरी आणले. याबाबतची माहिती मिळाल्यावर शाहूपुरी पोलिसांनी तिच्या घरी जाऊन चौकशी केली. परंतु, मुलगी भेदरलेली असल्याने जास्त बोलू शकली नाही. मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास पोलिसांनी तिला व पालकांना पोलीस ठाण्यात बोलावले होते. या प्रकरणाची माहिती घेऊन पोलिसांनी चौकशी सुरू केली होती. मुलीच्या कान व नाकातील सुमारे साडेतीन ग्रॅमचे दागिने आढळून आलेले नाहीत. तसेच त्या ठिकाणी रक्त आल्याचेही दिसत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. चाैकशीनंतर यातील वस्तुस्थिती समोर येणार आहे.