३१५ ठिकाणच्या पाणी नमुन्यात नायट्रेटचा अंश; आरोग्यासाठी धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2019 12:28 AM2019-12-06T00:28:03+5:302019-12-06T00:30:23+5:30
पीक कोणतेही असो; पण ते चांगले यावे, यासाठी ही खते वापरली जातात. त्यामुळे या रासायनिक खतांचा भयावह परिणाम समोर येऊ लागलाय. कारण, पिण्याच्या पाण्यामध्येही रासायनिक अंश आढळून येऊ लागलेत.
नितीन काळेल ।
सातारा : पिके चांगली येण्यासाठी शेतकरी दिवसेंदिवस रासायनिक खतांचा वापर अधिक करत आहेत. परिणामी या खतांचा अंश जमिनीतील पाण्यातही उतरत आहे. त्यामुळे जिल्ह्यात १ एप्रिल ते ३० आॅक्टोबरदरम्यानचे साडेसहा हजार पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासले असता त्यामधील ३१५ मध्ये नायट्रेटचा अंश आढळून आलाय. यामुळे खतांचा वाढता वापर आरोग्यासाठी धोकादायक ठरू पाहत आहे.
पाणी हेच जीवन आपल्याकडे म्हटले जाते; पण सद्य:स्थितीत शुद्ध पाणी मिळणेच अवघड झाले आहे. अनेक गावांना नळपणीपुरवठा योजना सुरू असल्यातरी वाडीवस्तीवरील लोक आजही विहीर, बोअर, हातपंपाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. नळाद्वारे पाणी पुरवण्यात येत असले तरी ते किती प्रमाणात शुद्ध असते, यावरही शंका असते. त्यातच आता पिकांसाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर करतात. पीक कोणतेही असो; पण ते चांगले यावे, यासाठी ही खते वापरली जातात. त्यामुळे या रासायनिक खतांचा भयावह परिणाम समोर येऊ लागलाय. कारण, पिण्याच्या पाण्यामध्येही रासायनिक अंश आढळून येऊ लागलेत.
जिल्हा परिषदेच्या पाणी गुणवत्ता संनियंत्रण कक्षाने यावर्षी १ एप्रिल ते ३० आॅक्टोबरदरम्यान ७ हजार ४५५ ठिकाणच्या पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले होते. या ठिकाणचेच पाणी ग्रामस्थ पित होते. यामधील ६ हजार ६०० ठिकाणच्या पाण्याची तपासणी जिल्ह्यातील प्रयोगशाळेत करण्यात आली. त्यावेळी या तपासणीत नायट्रेटचा अंश आढळलेले पाणी नमुने ३१५ हून अधिक आढळून आले.
जर पाण्यात नायट्रेटचे प्रमाण अधिक असेल तर त्याचा परिणाम सर्वप्रथम लहान बालकांवर होतो. विशेष म्हणजे असे पाणी उकळून प्यायचे म्हटले तरी त्यातील नायट्रेटच्या अंशाचे प्रमाण कमी होत नाही. त्यामुळे नायट्रेटचा अंश असणारे पाणी पिण्यासाठी धोकादायकच ठरू शकते. यावरून याचा वेळीच विचार करणे महत्त्वाचे ठरले आहे. रासायनिक खतांचा वापर कमी केल्यास बऱ्यापैकी आळा बसेल.
आरोग्याची गंभीर समस्या...
शेती पिकासाठी रासायनिक खते वापरली जातात. त्यामुळे पिकाला पाणी दिल्यानंतर खताचे अंश जमिनीत उतरतात. त्यानंतर हेच अंश जमिनीतील पाण्यात मिसळतात. त्यातूनच पिण्याच्या पाण्यातही अंश आढळून येतात. जर पाण्यात नायट्रेटचा अंश अधिक प्रमाणात असेल तर आरोग्याच्या गंभीर समस्येला सामोरे जावे लागते. हे प्रमाण रोखण्यासाठी आता सर्वांनाच काळजी घ्यावी लागणार आहे. तरच आरोग्य चांगले राहणार आहे. तर बागायत क्षेत्रात नायट्रेटचे प्रमाण अधिक आहे.
नायट्रेटने काय होते ?
पिण्याच्या पाण्यात नायट्रेटचे प्रमाण अधिक आढळल्यास रक्ताभिसरणासंबंधातील आजार निर्माण होतात. प्रमाण अधिक असल्याने मिथमाग्लोबेमियानचे प्रमाण रक्तात वाढते. लहान मुलांच्या रक्तातील आॅक्सिजनचे प्रमाण कमी होते. त्यामुळे मुले दगावूही शकतात. पाण्यात प्रमाणापेक्षा अधिक नायट्रेट असणे धोकादायकच ठरते. असे पाणी पिण्यायोग्य नसते, असे वैद्यकीय अधिकारी सांगतात.
पिण्याच्या पाण्यात नायट्रेटचा अंश अधिक प्रमाणात आढळून आल्यास असे पाणी लहान मुलांच्या आरोग्याच्या बाबतीत गंभीर आजार निर्माण करू शकते. यामुळे रक्तातील आॅक्सिजनचे प्रमाण कमी होते. तसेच नायट्रेटचा अंश असलेल्या या पाण्यापासून आरोग्यास धोका निर्माण होतो. असे पाणी कोणीही पिणे योग्य नसते. तसेच ‘आरओ’ने नायट्रेटचे तसेच इतर क्षाराचे प्रमाण कमी करता येते. असे पाणी पिण्यास योग्य ठरते. त्याने आरोग्यावर कसलाही अपाय होत नाही.
- डॉ. सुहास माने, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक