विद्यार्थांना आवडीचे विषय निवडीचे स्वातंत्र्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:40 AM2021-05-08T04:40:24+5:302021-05-08T04:40:24+5:30
सातारा : ‘आत्तापर्यंत विद्यापीठाचा पारंपरिक अभ्यासक्रम आणि जागतिक स्तरावर चाललेले बदल, यामध्ये मोठी तफावत आहे. ही दरी कमी ...
सातारा : ‘आत्तापर्यंत विद्यापीठाचा पारंपरिक अभ्यासक्रम आणि जागतिक स्तरावर चाललेले बदल, यामध्ये मोठी तफावत आहे. ही दरी कमी करण्याचे काम कर्मवीर भाऊराव पाटील समूह विद्यापीठ करेल. यामध्ये विद्यार्थांना आवडीचे विषय निवडीचे स्वातंत्र्य असेल. पारंपरिक शिक्षणाची चाकोरी मोडून कौशल्यावर आधारित शिक्षण देण्याचे काम हे समूह विद्यापीठ करेल,’ असा विश्वास रयत शिक्षण संस्थेचे चेअमन डाॅ.अनिल पाटील यांनी व्यक्त केला.
साताऱ्यात ‘कर्मवीर भाऊराव पाटील स्टेट पब्लिक युनिव्हीर्सिटी’ला मंत्रिमंडळाने मान्यता दिली. या पार्श्वभूमीवर डाॅ.पाटील यांच्याशी ‘लोकमत’ने संवाद साधला. समूह विद्यापीठाची स्कल्पना स्पष्ट करताना पाटील म्हणाले, ‘समूह विद्यापीठ हे शासकीय आहे. शासनाच्या अनुदानावर, शासकीय शुल्कामध्ये, शासनाच्या नियमाप्रमाणे चालणार आहे, परंतु अभ्यासक्रम ठरविणे, परीक्षा घेण्याचा अधिकार आणि काळाच्या गरजेप्रमाणे बदल करण्याचा अधिकार या समूह विद्यापीठास मिळाला आहे. सिलॅबसमध्ये बदल करण्याची खूप मोठी प्रक्रिया विद्यापीठांत असते. ती आत थेट न राहता संस्थेकडे आली. या यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालय, छत्रपती शिवाजी महाविद्यालय आणि धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय यांचा पहिल्या टप्प्यात या विद्यापीठात समावेश असेल. साडेसात हजार विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळेल. ही तिन्ही महाविद्यालये नॅकला ‘ए प्लस’ ग्रेडची आहेत. ती स्वायत्त महाविद्यालये आहेत. कला, शास्त्र व वाणिज्य या शाखेला ३३ यू जी कोर्सेस आहेत, १३ नवीन कोर्सेस सुरू करत आहोत. पीजी प्लसचे १२ कोर्सेस आहेत, १२ नवे सुरू करत आहोत. या समूह विद्यापीठात वाणिज्य, शास्त्र व कला या शाखेतील आवडीचे विषय विद्यार्थ्यांना निवडता येतील. सर्टिफिकेट, डिप्लोमा, डिग्री घेता येईल. पीजी, रिसर्च, पेटंट करता येईल. हे सगळं विद्यार्थ्यांना एकाच छताखाली करता येईल.
साताऱ्यातील तिन्ही स्वायत्त महाविद्यालये असल्याने त्यांचे स्ट्रक्चर तयार आहे. शासनाकडून प्रक्रीया लवकर राबविली गेली, तर कदाचित जुलैपर्यंत या विद्यापीठाचे कामकाज सुरू व्हायला हरकत नाही, असेही डॉ.पाटील यांनी स्पष्ट केले.
चौकट..
देशात सात समूह विद्यापीठे आहेत. त्यात महाराष्ट्रात दोन आणि तीही मुंबईत आहेत. मुंबईचे होमी भाभा, दुसरे हैद्राबाद सिंध तेही मुंबईतच आहे. आणि आता राज्यातील तिसरे आणि ग्रामीण भागातील पहिले म्हणून कर्मवीर भाऊराव पाटील स्टेट पब्लिक युनिव्हर्सिटी’ला मान मिळते आहे.
चौकट . . .
आण्णांची संकल्पपूर्ती
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी १९४१ साली भास्करराव जाधव यांना पत्र लिहून मला विद्यापीठ काढायचे आहे, तेही ग्रामीण विद्यापीठ, असा मनोदय व्यक्त केला होता. तेव्हा रयत शिक्षण संस्थेचे एकच हायस्कूल होते, पण त्यावेळी आपण कुठे जायचे आहे, हे ध्येय अण्णांनी ८० वर्षांपूर्वी निश्चित केले होते. १९४८ला महात्मा गांधींच्या निधनानंतर साताऱ्यात शोक सभा झाली. त्यावेळी महात्मा गांधी यांच्या नावाने १०१ हायस्कूल आणि विद्यापीठ काढण्याचा संकल्प कर्मवीर अण्णांनी जाहीर केला होता. तो संकल्प अण्णांच्या नावाने विद्यापीठ होत असताना पूर्ण होत आहेत.