म्हसवेच्या ओसाड माळरानावर फुलणार फळं अन् फुलझाडं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 11:24 PM2019-07-14T23:24:15+5:302019-07-14T23:24:27+5:30
सातारा : पुणे-सातारा महामार्गावरील सातारा पोलिसांच्या मालकीची ४० एकर जमीन अनेक वर्षांपासून पडीक होती. या ओसाड माळरानावर पोलीस व ...
सातारा : पुणे-सातारा महामार्गावरील सातारा पोलिसांच्या मालकीची ४० एकर जमीन अनेक वर्षांपासून पडीक होती. या ओसाड माळरानावर पोलीस व सामाजिक वनीकरण विभागाच्या प्रयत्नांमुळे १८ हजार झाडांची लागवड करण्यात आली. त्यामुळे आगामी काही वर्षांनंतर याच ओसाड माळरानावर आमराई फुलल्याचे चित्र पाहावयास मिळणार आहे.
सातारा जिल्ह्याला ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. त्याचबरोबर पुरोगामी जिल्हा म्हणूनही ओळखला जात असल्याने अनेक नवनवीन उपक्रमांची सुरुवात साताऱ्यातून झाली आहे. त्यानंतर त्याचे अनुकरण राज्य तसेच देशाने केली आहे. सातारा पोलीस दलाच्या वतीने नवनवीन प्रयोग केले गेले आहेत. त्यात आणखी एका उपक्रमाची भर पडली आहे. सातारा शहरानजीक पोलीस दलाच्या मालकीची ४० एकर शेत जमीन आहे. ही शेत जमीन अनेक वर्षांपासून पडीक आहे. त्याचा वर्षातून केवळ एकदाच गोळीबाराचा सराव करण्यासाठी केला जातो. या जागेचा वापर करण्यासाठी प्रशासनाने वृक्षरोपण करण्याचा निर्णय घेतला. उन्हाळ्यात खड्डे खणले होते. पहिल्या पावसानंतर पोलीस व सामाजिक वनीकरण यांच्या माध्यमातून आंबा, चिंच, आवळा, सीताफळ या झाडांची लागवड केली आहे.
सामाजिक वनीकरण जगविणार झाडे
ओसाड माळरानावर लागवड केलेल्या फळझाडे जगविण्याची संपूर्ण जबाबदारी सामाजिक वनीकरण विभागाने घेतली आहे. झाडे तीन वर्षांची झाल्यानंतर त्याचे संगोपनाची जबाबदारी पोलीस विभागाची राहणार आहे. त्याच्या फळ झाडांच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न पोलीस विभागाला मिळणार आहे. त्याचा वापर पोलीस कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी होऊ शकतो.