वेळे
भूमी अभिलेख कार्यालय, वाईच्या अधिपत्याखाली येणाऱ्या भुईंज येथील कार्यालयाला अखेर पूर्णवेळ कर्मचारी मिळाला. त्यामुळे वाई तालुक्याच्या पूर्व भागातील जनतेची कामे आता अधिक वेगाने होण्यास मदत होणार आहे.
भुईंज येथील भूमी अभिलेख कार्यालयात गेल्या कित्येक वर्षांपासून पूर्णवेळ कर्मचारी नव्हता. त्यामुळे वाई तालुक्याच्या पूर्व भागातील नागरिकांना आपल्या जमिनीविषयीची कामे पूर्ण करण्यासाठी आठवड्यातून फक्त बुधवार आणि गुरुवारी येथील कार्यालयात जावे लागत असे. आठवड्यातून फक्त दोनच दिवस हे कार्यालय चालू असल्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती. मात्र आता एक मार्च २०२१ पासून या कार्यालयाला पूर्णवेळ कर्मचारी मिळाल्याने नागरिकांची होणारी तारांबळ यामुळे थांबणार आहे.
येथे नियुक्त झालेल्या पूर्णवेळ कर्मचाऱ्याला वाई येथे अतिरिक्त कार्यभार दिल्याने एक मार्चपासून भुईंज येथील कार्यालय पूर्णवेळ चालू झाले नाही. आता लवकरच भुईंज येथील भूमी अभिलेख कार्यालय आठवड्यातील सर्व कामाच्यादिवशी पूर्णवेळ चालू राहणार असल्याची माहिती उपअधीक्षक, भूमी अभिलेख कार्यालय, वाई यांनी दिली आहे.
वाई तालुक्यातील पूर्व भागातील सर्व गावांच्या नागरिकांना भुईंज येथील भूमी अभिलेख कार्यालयात जमिनीच्या नोंदी, वारस नोंदी करण्यासाठी जावे लागायचे. तेथे पूर्णवेळ कर्मचारी नसल्याने प्रत्येक आठवड्याच्या बुधवार आणि गुरुवारी या कार्यालयात नेहमी गर्दी होते. त्यामुळे येथील नागरिकांची कामे होण्यास विलंब लागत होता. त्यांच्या मागणीनुसार भुईंज येथील कार्यालयाला पूर्णवेळ कर्मचारी पाहिजे होता. अखेर नागरिकांच्या मागणीनुसार भुईंज येथील भूमी अभिलेख कार्यालयाला पूर्णवेळ कर्मचारी मिळाल्याने वाई तालुक्यातील पूर्व भागातील जनतेला दिलासा मिळाला आहे. पूर्णवेळ कर्मचारी मिळाल्याने येथील नागरिकांची होणारी धावपळ व परवड आता कमी होणार असून, त्यांची कामेही वेळेत पूर्ण होण्यास मदत होणार आहे.