वाई खोऱ्यातील अनपटवाडीत मुलींचीच मनसबदारी ! प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर : स्त्री जन्माचा अवघ्या गावाला अभिमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 12:31 AM2018-02-13T00:31:22+5:302018-02-13T00:32:02+5:30
सातारा : पुरुषी मानसिकतेमुळे समाजात आजही स्त्रीभ्रूण हत्यासारख्या घटना घडत आहे. अनेक ठिकाणी महिलांचा अनादरही केला जातो. मात्र,
सचिन काकडे ।
सातारा : पुरुषी मानसिकतेमुळे समाजात आजही स्त्रीभ्रूण हत्यासारख्या घटना घडत आहे. अनेक ठिकाणी महिलांचा अनादरही केला जातो. मात्र, वाई तालुक्यातील अनपटवाडी या गावातील मुली व महिलांची आज सर्वच क्षेत्रांत मनसबदारी पाहायला मिळते. या गावाने श्री ग्राम विकास मंडळाच्या माध्यमातून स्त्रीत्त्वाचा आदर करण्याबरोबरच त्यांच्या कल्याणासाठी नव्या योजना हाती घेतल्या आहेत.
अनपटवाडी हे ३७५ लोकसंख्या असलेलं छोटसं गाव. या गावातील काही कर्ती पुरुष मंडळी अन्य शहरात नोकरी, व्यवसायासाठी स्थायिक झाली आहेत. तर काही शेती व इतर व्यवसायाशी जोडले गेले आहेत. युवकांनी एकत्र येऊन १९९८ रोजी श्री ग्राम विकास मंडळाची स्थापना केली अन् पुढे गावाच्या विकासाची खºया अर्थाने सुरुवात झाली. या मंडळाने ग्रामस्थांच्या सहकार्याने स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी सर्वप्रथम ‘लेक वाचवा, लेक वाढवा आणि लेक शिकवा’ हे अभियान सुरू करून ग्रामस्थांचे प्रबोधन केले. या अभियानाचे दुरगामी परिणाम आज दिसून येत आहे. गावात मुलांपेक्षा मुलींची संख्या अधिक आहे. गावातील मुला-मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले जाते. गरीब कुटुंबातील मुलींना आर्थिक मदत करण्याबरोबच उच्च शिक्षणासाठी सहकार्यही केले जाते. अनेक कार्यक्रम महिलांच्या पुढाकारातून साजरे केले जातात.
प्रजासत्ताकदिनी झेंडा वंदनाचा मान हा गावचे प्रथम नागरिक सरपंच यांचा असतो, परंतु ग्रामपंचायतीने यावेळी हा बहुमान शाळेतील आपल्या लेकींना दिला. प्रजासत्ताक दिनी मुलीच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. एवढेच नव्हे तर मुलींची घोड्यावरून वाजत-गाजत मिरवणूकही काढण्यात आली. या गावातील मुली व महिलाच नव्हे तर सुनाही उच्चशिक्षित आहे. गावातील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी ग्राम विकास मंडळाच्या वतीने सर्वांचा गौरवही केला जातो. मंडळाचे अध्यक्ष अनिल अनपट, सचिव हणमंत मांढरे, नितीन मांढरे, सयाची अनपट, सरपंच मोहन अनपट यांच्या मार्गदर्शनाखाली अनपटवाडी गावाने विकासाकडे वाटचाल सुरू केली आहे.
गावातील २१ कन्यांच्या नावे ठेवपावती
श्री ग्राम विकास मंडळातर्फे जन्माला येणाºया मुलींचं स्वागत मोठ्या उत्साहात केले जाते. जन्माला येणाºया गावातील प्रत्येक मुलीच्या नावे बॅँकेत पाच हजार रुपयांची ठेवपावती केली जाते. मुलगी एकवीस वर्षांची होताच तिला ही रक्कम मिळते. मंडळाने आतापर्यंत २१ मुलींच्या नावे ठेवपावती केली आहे.
शेतकरी ते इंजिनिअर...
अनपटवाडी गावातील मुलीच नव्हे तर या गावात लग्न होऊन आलेल्या सुनाही उच्चशिक्षित आहेत. अनेक महिला या मोठ्या पदावर कार्यरत आहेत. शेतीची कामे करण्याबरोबरच येथील अनेक महिला या शिक्षिका, सीए, अभियंता असून वकिलीही करीत आहेत.
गावाने सुरू केलेले ‘लेक वाचवा लेक वाढवा’ अभियान सर्वांना आदर्शवत असेच आहे. ग्रामविकास मंडळ व ग्रामस्थांच्या पुढाकारातून राबविल्या जाणाºया उपक्रमातून लेकी अन् सुनांचाही सन्मान होत आहे.
- रेणुका काळे,
शिक्षिका, जिल्हा परिषद शाळा