मलकापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी येथील पालिकेस शहराची लोकसंख्या विचारात घेऊन लसीकरणासाठी प्रतिदिन पाचशे डोस लस उपलब्ध करावी. ती देण्यासाठी जिल्हाधिकारी व जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना कराव्यात, अशी विनंती उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
पत्रातील मजकुरानुसार जिल्ह्यात सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. सध्या मलकापूरमध्ये २३४ बाधित रुग्ण आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हाती घेतलेली लसीकरण मोहीम सातत्याने सुरू ठेवून ४५ वर्षांवरील नागरिकांना लसीकरण करणे आवश्यक आहे. शहरासाठी भारती विद्यापीठ विधि महाविद्यालय व श्रीमती प्रेमलाताई चव्हाण महिला विकास केंद्र, आगाशिवनगर या ठिकाणी लसीकरण केंद्रे सुरू आहेत. दोन्ही केंद्रांवर ७ एप्रिलपासून लसीकरण सुरू असून, आजअखेर फक्त २ हजार ८०१ नागरिकांना लस देली आहे.
पालिकेस २७ एप्रिलपासून ते ११ मे पर्यंत लस उपलब्ध न झाल्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त आहे. सध्या शहराची लोकसंख्या ३७ हजारांपेक्षा जास्त असून, ४५ वर्षांवरील नागरिकांची संख्या दहा हजारापेक्षा जास्त आहेत. या सर्व नागरिकांना लसीचा पहिला डोस देणे आवश्यक आहे. तथापि, पुरेशी लस उपलब्ध होत नसल्याने उर्वरित नागरिक लसीपासून वंचित राहिले आहेत. आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार ज्या नागरिकांना पहिला डोस घेऊन ४५ दिवस पूर्ण झालेले आहेत, त्या नागरिकांचा दुसरा डोस देणे आवश्यक आहे. मलकापूर शहर हे काले प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत आहे. या केंद्राच्या माध्यमातून पालिकेस लस उपलब्ध करून दिली जाते.
येथील लोकसंख्येच्या प्रमाणात लसीचा वेगळा कोटा पालिकेस मिळणे आवश्यक आहे. याचा विचार करून ४५ वर्षांवरील नागरिकांच्या पहिल्या व दुसऱ्या डोससाठी प्रतिदिनी किमान ५०० लस डोस द्या, अशी मागणी पत्रकाद्वारे केली आहे. त्यानुसार मलकापूरला केवळ २०० च डोस दिले असल्यामुळे अनेक नागरिकांना परत जावे लागले आहे.
चौकट
दहा दिवसांनंतर दोनशे नागरिकांना दुसरा डोस
लस उपलब्ध नसल्यामुळे दहा दिवसांपासून लसीकरण बंद होते. दहा दिवसांनंतर लस देण्यास सुरुवात झाल्यामुळे नागरिकांनी लसीकरण केंद्रावर गर्दी केली होती. पोलीस बंदोबस्तात लसीकरण सुरू होते. नागरिकांना सावलीसह सोशल अंतरात बसण्याची व्यवस्था पालिकेने केली होती. जेवढी लस उपलब्ध आहे, तेवढ्याच पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना प्राधान्य देऊन नागरिकांना टोकन दिले होते. त्यामुळे लसीकरण सुरळीत सुरू होते.
फोटो १७मलकापूर लसीकरण
मलकापूरमध्ये पालिकेने सोशल डिस्टन्स राखत लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांना बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था केली होती. (छाया - माणिक डोंगरे)