सातारा - सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकात पाटील यांनी खासदार उदयनराजे भोसलेंना टोला लगावला आहे. गणपती विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी लावण्याच्या प्रश्नावर बोलताना, ज्यांना डॉल्बी लावून नाचायचे आहे, त्यांनी मैदानात जाऊन धिंगाणा घालावा, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. कारण, उदयनराजेंनी डॉल्बी लावूनच गणपतीची मिरवणूक काढणार असल्याचे म्हटले होते.
गणेशोत्सवात मोठ-मोठ्याने सिनेमातील गाणी डॉल्बीवर लावण्यापेक्षा भजन लावा आणि जर नाचायचेच असेल तर प्रत्येक गावात एक मैदान असते जिथे जाऊन काय धिंगाणा घालायचाय तो घाला, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. साताऱ्याच्या दुष्काळी माण आणि खटाव तालुक्यातील 31 गावांना टेम्भू जलसिंचन योजनेतून पिण्याचे पाणी दिले जाणार आहे. या योजनेचे भूमिपूजन चंद्रकांत पाटील व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांचा हस्ते करण्यात आले. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी नाव न घेता उदयनराजेंना टोला लगावला. तसेच लोकमान्य टिळकांनी घरातील गणपती चौकात आणला. पण, आता चौकातील गणपती घरात घेऊन जायची वेळ आली आहे, असेही पाटील यांनी म्हटले.
दरम्यान, गणपती विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी लावरणारच आणि मंगळवार तळ्यात विसर्जन करणारच असा पवित्रा उदयनराजेंनी घेतला आहे. डॅाल्बीने प्रदूषण होतंय तर पुण्यातील सनबर्न फेस्टीव्हलमध्ये प्रदुषण होत नाही का, राज्यातील कंपन्यांच्या प्रदुषणाचे काय? असा सवाल उदयनराजेंनी उपस्थित केले आहेत. तसेच मी माझ्या मालकीच्या तळ्यात मला जे हवयं ते करणार, जो गुन्हा दाखल होईल तो माझ्यावर होईल अशा इशाराही उदयनराजेंनी दिला आहे.