महाबळेश्वर - राज्याचे राज्यपाल रमेश बैस हे महाबळेश्वरमध्ये दाखल झाले आहेत. महाबळेश्वर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील, बांधकाम विभागाचे मुख्यअभियता अतुल चव्हाण, कोल्हापूर परीक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी ,महाबळेश्वर तहसिलदार तेजस्वीनी पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. २२ ते २५ असा तीन दिवसांचा राज्यपालांचा दौरा असून या कालावधीत ते प्रशासनाबरोबर बैठक घेणार असून लोकप्रतिनिधी यांच्याबरोबरही चर्चा करणार आहेत. महाबळेश्वरात राज्यपाल यांच्या दौऱ्यामुळे महाबळेश्वर - पाचगणी दरम्यानची वाहतुक काही वेळ थांबविण्यात आली होती. परिणामी वाहतुक कोंडी होऊन वाहनाच्या लांबच लांब रागा लागल्या होत्या. ऐन हंगामात पर्यटक तासनतास अडकून पडल्यामुळे पर्यटकामधून नाराजी व्यक्त होऊ लागली आहे.
महाबळेश्वरमध्ये राज्यपाल रमेश बैस याचा आज (दि. २२ ) पासून गुरूवार पर्यत दौरा असल्यामुळे वाई ते महाबळेश्वर परिसरात छावणीचे स्वरूप आले आहे. चौकाचौकात ठराविक अंतरावर पोलिस कर्मचारी तैनात केल्यामुळे रस्त्यावरील वाहतूक अंतर्गत मार्गाने वळविण्यात आली आहे. काही ठिकाणी वाहतूक थांबविण्यात आली होती तर प्रसिध्द वेण्णालेक नौकाविहारासाठी पर्यटकांना काही वेळ बंद करण्यात आले होते.
महाबळेश्वरमध्ये मे हंगाम जोरदार सुरू असून मोठ्या प्रमाणात लाखोंच्या संख्येने पर्यटक दाखल झाले आहेत. तर शुक्रवार, शनिवार, रविवार सुट्टी साजरी करून पर्यटक परतीच्या दिशेने निघाले आहेत. खाजगी वाहने व बसेस सकाळी नऊ वाजता बसेस सोडण्यात येतात. परंतु आज बस सोडण्यात आलेल्या नाहीत. ज्या ठिकाणी बसेसची पार्किंग आहे तेथून या बसेस हलविण्यात आल्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात बसेस लावायच्या कुठे असा प्रश्न ट्रँव्हल व्यवस्थापनाला पडला आहे. काही ओळखीच्या बंगल्यामध्ये बस लावण्यात आल्या तर सकाळी नऊ वाजल्या पासून रूम सोडून निघणाऱ्या पर्यटकांची वरात लगेज सहित बाजारपेठ मध्ये फिरताना दिसून येत होत्या. वाहतूक कोंडीत पर्यटकांना एक वाजेपर्यत भर उन्हात उभे केल्यामुळे पर्यटक व स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.