मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक, आंदोलनाची आवश्यकता नाही - मुख्यमंत्री
By दीपक शिंदे | Published: January 24, 2024 07:36 PM2024-01-24T19:36:25+5:302024-01-24T19:37:19+5:30
जरांगे-पाटील यांनी आपले आंदोलन मागे घ्यावे
सातारा : मराठा समाजाला आरक्षण मिळण्याबाबत सरकार सकारात्मक आहे. मराठा समाज मागास कसा आहे याबाबत मागासवर्ग आयोगाच्या मार्गदर्शनाखाली १ लाख ४० हजार कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्याचा अहवाल मिळाल्यानंतर विशेष अधिवेशन घेऊन टिकणारे आरक्षण देण्याबाबत सरकार निर्णय घेणार आहे. त्यामुळे जरांगे-पाटील यांनी आपले आंदोलन मागे घ्यावे, असे स्पष्ट मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.
महाबळेश्वर तालुक्यातील दरे तर्फ तांब या आपल्या गावी देवाच्या यात्रेनिमित्त आल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठा समाज आरक्षणासाह विविध प्रश्नांवर भाष्य केले.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मराठा समाजाला टिकणारे आरक्षण दिले जाईल. यासाठी परिपूर्ण माहिती हवी आहे. सर्वेक्षणासाठी येणाऱ्या लोकांना ही माहिती द्यावी. सुदैवाने क्युरिटिव्ह पिटीशनबाबतही सर्वोच्च न्यायालयाने सकारात्मक भूमिका घेतली आहे. राज्याला जो अधिकार दिला आहे. त्यानुसार आरक्षणासाठी सरकार सकारात्मक आहे. त्यामुळे सरकारला मदत केली पाहिजे. ओबीसी समाजाप्रमाणे आपण मराठा समाजाला सुविधा देतोय. सारथी, अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाच्या माध्यमातून काही सुविधा देत आहोत. ज्याठिकाणी मराठा समाजाच्या लोकांना राहण्याची अडचण आहे. त्याठिकाणी वसतिगृहे बांधण्याचे काम सुरू आहे. काहींच्या नियुक्त्या रखडल्या होत्या. अशा साडेचार हजार मुलांना नियुक्त्यादेखील दिल्या आहेत.
अनेक कुणबी नोंदी सापडल्या आहेत. ज्यांचे रेकॉर्ड इतर राज्यांत होते. दुसऱ्या भाषेत होते. त्यासाठी उर्दू, फारशी भाषेतील आणि निजामकालीन रेकॉर्ड काढून दिले आहे. आतापर्यंत कधीही न झालेले काम सरकार करते आहे. सर्वसामान्यांच्या व्यथा जाणणारे सरकार आहे. त्यामुळे आंदोलनाची आवश्यकता नाही, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.
खिचडी आणि कफन चोरांना लोक निवडून देतील ?
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर आरोप केले होते. यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी कोरोनात खिचडी, मृतदेहांवरील कफन ज्यांनी चोरले, त्यांना काय म्हणायचे ?. घरी बसलेल्या लोकांना लोक सत्तेत आणतात का ?, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्घाटनाला बोलावले की त्यांना पोटदुखी सुरू होते. डबल इंजिनचे सरकार बुलेट ट्रेनच्या गतीने काम करत आहे. याचा त्यांना पोटसूळ आहे. आमचे सरकार कामाला महत्त्व देते. शिवडी-न्हावाशेवा मार्ग, समृद्धी महामार्ग केला. बंद पाडलेली मेट्रो सुरू केली. विकास हाच आमचा अजेंडा आहे. नुकताच डाओसमध्ये गेलो अन् करार केले, आता रोजगार निर्माण करणार आहे. अशावेळी लोक इतरांचा विचार कशासाठी करतील ? असा प्रहार केला.