ग्रा. पं. निवडणुकीत उमेदवार, प्रतिनिधींच्या कोरोना चाचणीला प्रशासनाचा फाटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:39 AM2021-01-13T05:39:36+5:302021-01-13T05:39:36+5:30
सातारा : जिल्ह्यात अद्यापही कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. मात्र, असे असताना सध्या सुरू असणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवार ...
सातारा : जिल्ह्यात अद्यापही कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. मात्र, असे असताना सध्या सुरू असणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवार व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कोरोना चाचण्या केल्या गेल्या नाहीत. शासनाकडून चाचणीसंदर्भात मार्गदर्शक सूचना मिळाल्या नसल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.
सातारा जिल्ह्यातील ८७८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका सध्या सुरू आहेत. गावोगावी उमेदवारांचे प्रचारही जोरदार सुरू आहेत. त्यातच अद्यापही कोरोना संपलेला नाही. त्यामुळे मतदारांच्या संपर्कात येणाऱ्या उमेदवार आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांची कोरोना चाचणी करणे अनिवार्य केले गेले नाही. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत काेरोनाचा संसर्ग फैलावण्याची शक्यता आहे. जिल्हा प्रशासनाकडून चाचणीसंदर्भात आरोग्य विभागाला कोणत्याही प्रकारच्या मार्गदर्शक सूचना मिळाल्या नाहीत. त्यामुळे एकाही उमेदवाराची कोरोना चाचणी केली गेली नाही. महिनाभरापासून ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, कोरोनाचा फैलाव अधिक संभावण्याचा धोका आहे.
जिल्ह्यात ८५ क्षेत्रिय अधिकाऱ्यांची निवड
जिल्ह्यात ८७८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. यातील १२३ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे क्षेत्रिय अधिकाऱ्यांना फारसे काम उरले नाही. जिल्ह्यात ९१ क्षेत्रिय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून देखरेख ठेवली जाणार आहे. तितकेच कर्मचारी आहेत. ग्रामसेवक, तलाठी यांनाही नेमण्यात आले आहे. पोलिसांचाही बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काय काळजी घेतली
निवडणुकीच्या धांदलीत कोरोना अजून संपला नाही, असे अनेकांना वाटू लागले आहे. त्यामुळे केवळ तोंडाला मास्क लावूनच कार्यकर्ते इतरत्र फिरत आहेत. सोशल डिस्टन्सिंगचा तर फज्जाच उडालेला आहे. कोठेही याचे पालन होत नाही. जेवणावळी सुरूच आहेत. काही ठिकाणी केवळ उमेदवार काळजी घेताना दिसत आहेत. खिशात सॅनिटायझर अन् तोंडाला मास्क लावून उमेदवार प्रचारात उतरलेत. बऱ्याच कार्यकर्त्यांकडे मास्कही नाहीत.