दुकानदाराच्या अंगठ्यावरच मिळणार धान्य!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:41 AM2021-05-07T04:41:16+5:302021-05-07T04:41:16+5:30
कोरोनामुळे स्वस्त धान्य दुकानदारांच्या अंगठ्याने शिधापत्रिकाधारकांना रेशनिंगच्या धान्याचे वाटप व्हावे, ही दुकानदारांची मागणी मार्गी लागली आहे. पुरवठा विभागाने त्यासंदर्भातील ...
कोरोनामुळे स्वस्त धान्य दुकानदारांच्या अंगठ्याने शिधापत्रिकाधारकांना रेशनिंगच्या धान्याचे वाटप व्हावे, ही दुकानदारांची मागणी मार्गी लागली आहे. पुरवठा विभागाने त्यासंदर्भातील निर्णय घेतला असून गुरुवारपासून धान्य वाटप सुरू करण्यात आले आहे. कोरोना संसर्गाचा विचार करून शासनाने धान्य दुकानदारांच्या अंगठ्यावर धान्य देण्याची परवानगी द्यावी. धान्य दुकानदारांचे कमिशन तातडीने अदा करावे. धान्य दुकानदारांना विमा संरक्षण द्यावे, यासह अन्य मागण्यांसाठी ऑल महाराष्ट्र शेअर प्राईज शॉप किपर फेडरेशनचे अध्यक्ष गजानन बाबर, विजय गुप्ता, नितीन पेंटर यांच्या नेतृत्वाखाली १ मेपासून राज्यातील सरकारमान्य स्वस्त दुकानदारांचा संप सुरू होता. जिल्ह्यातही जिल्हाध्यक्ष अशोकराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली १ हजार ७९४ दुकानदार संपात सहभागी झाले होते.
दुकानदारांच्या मागण्यांसंदर्भात शासन पातळीवर फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा झाली. त्यानंतर पुरवठा विभागाने आता सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानदारांच्या अंगठ्याने शिधापत्रिकाधारकांना रेशनिंगच्या धान्याचे वाटप करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे दुकानदारांसह सर्व लाभार्थ्यांना असलेला संसर्गाचा धोका कमी होणार आहे. त्याचबरोबर दुकानदारांच्या कमिशनचा प्रश्नही मार्गी लागणार असल्याने महाराष्ट्र दिनापासून फेडरेशनच्या नेतृत्वाखाली बंद असलेले धान्य वाटप ग्राहकांच्या हिताचा विचार करून गुरुवारपासून पूर्ववत सुरू करण्यात आले आहे.