सांडवे झाले गायब.. ..पाणी गेले वाहून !
By admin | Published: August 31, 2015 08:20 PM2015-08-31T20:20:23+5:302015-08-31T23:39:42+5:30
फलटण तालुका : लघु पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष
आदर्की : फलटण तालुक्याचा पश्चिम भाग दुष्काळी असल्याने १९७२ मध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार हमी योजनेतून पाझर तलाव झाले. त्यांचा फायदा शेतकरी वर्गांना झाला; परंतु लघु पाटबंधारे विभगाचे दुर्लक्ष केल्याने सांडव्याच्या भिंती जीर्ण होऊन पाणीसाठा होत नसल्याने सांडवे बांधण्याची गरज आहे.फलटण पश्चिम भाग दुष्काळी आहे. परंतु डोंगररांगा असल्याने पाणी अडविण्यास वाव असल्याने १९७२ मध्ये लोकांना हाताला काम मिळावे व पाणी अडवून जमिनीत मुरावे, हे उद्दिष्ट डोळ्यांसमोर चिमणराव कदम यांनी अधिकारी-ग्रामस्थांना बरोबर घेऊन प्रत्येक गावात साईट उपलब्ध करून देऊन प्रत्येक ओढ्यावर दोन-चार पाझर तलाव मंजूर करून एका गावात चारपाच पाझर तलावांची निर्मिती झाल्याने लोकांना दुष्काळात काम मिळाले आणि पावसाळ्यात पाझर तलावात पाणीसाठा झाल्याने विहिरींच्या पाणीसाठ्यातही वाढ झाली. तो पाणीसाठा स्थिर राहावं म्हणून पाझर तलावास सांडवा म्हणून सिमेंट भिंती बांधल्यामुळे पाणीसाठा टिकून राहत होता; परंतु काही ठिकाणी भिंती जीर्ण झाल्या तर काही वाहून गेल्या आहेत.
काही शेतकरी वर्गात जमिनी पाण्याखाली जातात म्हणून फोडल्या आहेत. त्यामुळे पाणीसाठा होत नाही. संबंधित विभागाने पाझर तलावांच्या सांडव्याची पाहणी करून दुरुस्ती करण्याची मागणी आहे. (प्रतिनिधी)