किराणा दुकानाला आग; ८० लाखांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:32 AM2021-01-09T04:32:53+5:302021-01-09T04:32:53+5:30
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, उंब्रज येथील शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये श्रीराम ट्रेडिंग कंपनी नावाचे सागर पाटील यांचे किराणा मालाचे होलसेल ...
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, उंब्रज येथील शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये श्रीराम ट्रेडिंग कंपनी नावाचे सागर पाटील यांचे किराणा मालाचे होलसेल विक्रीचे दुकान आहे. शुक्रवारी पहाटे दुकानात शॉर्टसर्किट होऊन अचानक आग लागली. या आगीमुळे धुराचे लोट बाहेर येऊ लागल्याचे एका वाहनधारकाच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्याने घटनेची माहिती ग्रामस्थांसह पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस तातडीने त्याठिकाणी पोहोचले. तसेच ग्रामस्थांनीही घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत दुकान बंद असल्याने दुकानातील धान्यासह तेल डबे, तेल पिशव्यांनी पेट घेतला. परिणामी, आग दुकानात अंतर्गत भागात मोठ्या प्रमाणात पसरली.
घटनास्थळी कऱ्हाड पालिका तसेच जयवंत शुगर कारखान्याचा अग्निशामक बंब तातडीने हजर झाला. दुकानातील गोडेतेल पेटल्याने आग सर्वत्र पसरली होती. दुकानाच्या खिडकीतून धूर बाहेर पडत होता. यावेळी अग्निशामक दलाच्या बंबांनी आग आटोक्यात आणली. युवकांनी दुकानातील मिळेल ते साहित्य बाहेर काढून आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. आग विझल्यानंतर उंब्रजचे गावकामगार तलाठी संदीप काळे यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. लाकडी फर्निचरसह किराणा मालाचे साहित्य व इतर वस्तू मिळून सुमारे ८० लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे त्यांनी पंचनाम्यात नमूद केले आहे
फोटो : ०८केआरडी०७
कॅप्शन : उंब्रज (ता. कऱ्हाड) येथील श्रीराम ट्रेडिंग कंपनी हे किराणा मालाचे दुकान आगीत खाक झाले. (छाया : अजय जाधव)