उन्हाळ्यातही जिल्ह्यातील भूजल पातळीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:38 AM2021-05-16T04:38:26+5:302021-05-16T04:38:26+5:30
सातारा : जिल्ह्यात दोन वर्षांपासून पडत असणारा समाधानकारक पाऊस आणि जलसंधारणाची कामे यामुळे पाणीपातळी टिकूून राहत आहे. याचाच परिणाम ...
सातारा : जिल्ह्यात दोन वर्षांपासून पडत असणारा समाधानकारक पाऊस आणि जलसंधारणाची कामे यामुळे पाणीपातळी टिकूून राहत आहे. याचाच परिणाम म्हणजे उन्हाळ्याही सर्वच तालुक्यातील भूजल पातळीत वाढ दिसून आली. विशेष म्हणजे, माण व खटावसारख्या दुष्काळी तालुक्यात स्थिती अधिक चांगली आहे.
भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या वतीने दरवर्षी जानेवारी, मार्च, मे आणि सप्टेंबर या महिन्यात भूजल सर्वेक्षण करण्यात येते. त्यासाठी जिल्ह्यातील १०६ विहिरी निश्चित करण्यात आलेल्या आहेत. या वर्षीही मार्च महिन्यात जिल्ह्यातील भूजल पातळी मोजण्यात आली. त्यावेळी जिल्ह्यातील सर्व ११ तालुक्यांत भूजल पातळी वाढल्याचे दिसून आले.
जिल्ह्यात एकूण निरीक्षण विहिरींची संख्या १०६ आहे. यामध्ये सर्वाधिक विहिरी या खटाव तालुक्यात १७ तर माणमध्ये १६ आणि कऱ्हाडला १५ आहेत. त्याचबरोबर, फलटण तालुक्यात १२, सातारा व पाटण तालुका प्रत्येकी १०, कोरेगाव ९, वाई ८, खंडाळा तालुका ५, महाबळेश्वर ३ आणि जावळी तालुक्यात १ निरीक्षण विहीर आहे. येथील भूजल पातळीची वाढ पाहता मार्च महिन्यात जावळी तालुक्यात २.७० मीटरवर भूजल पातळी आढळून आली. कऱ्हाडला ३.९५ मीटर, खंडाळा ४ मीटर, खटावला ६.१६ तर कोरेगाव तालुक्यात ५.६७ मीटरवर भूजल पातळी होती, तसेच माणमध्ये ५.८०, महाबळेश्वर १३.४०, पाटण ४.२५, फलटण ५.८८, सातारा ४.३४ आणि वाई तालुक्यात ६.८९ मीटरवर दिसून आली.
मागील ५ वर्षांच्या तुलनेत जावळी तालुक्यात ०.३६ मीटरने भूजल पातळी वाढल्याचे दिसून आले, तर कऱ्हाडला ०.९९, खंडाळा १.४६, कोरेगाव १.२२, महाबळेश्वर ०.९४, पाटण तालुक्यात ०.५५, फलटण १.०३, सातारा ०.६६ आणि वाई तालुक्यात ०.८९ मीटरची वाढ नोंदली. विशेष म्हणजे, माण आणि खटाव या तालुक्यात पातळी चांगलीच वाढली आहे. खटावला २.३५ तर माणमध्ये २.३६ मीटरची वाढ आहे. जिल्ह्यात ही सर्वाधिक भूजल पातळी वाढ आहे.
जिल्ह्यात मागील दोन वर्षे चांगला पाऊस झाला. त्याचबरोबर पावसाचा कालावधी नोव्हेंबरपर्यंत राहिला याचा हा परिणाम आहे. त्याचबरोबर, माण, खटाव आणि कोरेगाव या तालुक्यात वॉटर कप व शासनाच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात झाली आहेत. त्यामुळे पाणी अडून राहून मुरत आहे. याचा परिणाम म्हणजे दुष्काळी तालुक्यात सर्वात अधिक पाणी पातळीत वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
चौकट :
९४ विहिरींत वाढ...
जिल्ह्यात १०६ निरीक्षण विहिरी आहेत. मार्चमध्ये सर्वेक्षण केल्यावर ९४ विहिरींमध्ये वाढ तर १२ ठिकाणी घट आढळून आली. गेल्या वर्षी १४ विहिरीत घट होती. यंदा चांगली स्थिती आहे. तर खंडाळा तालुक्यातील १, कोरेगाव २, पाटण ४, वाई १ आणि सातारा आणि फलटण या तालुक्यातील प्रत्येकी २ अशा या १२ विहिरी आहेत, तर इतर तालुक्यातील सर्व निरीक्षण विहिरींमध्ये वाढ दिसून आली आहे.
......................................................................