गुटखा विक्री जोमात अन्न प्रशासन कोमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:35 AM2021-03-15T04:35:23+5:302021-03-15T04:35:23+5:30
रहिमतपूर : राज्यात गुटखा विक्रीला बंदी असतानाही कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर येथे गुटख्याची दणक्यात विक्री सुरू आहे. विक्रेत्यांना अभय दिले ...
रहिमतपूर : राज्यात गुटखा विक्रीला बंदी असतानाही कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर येथे गुटख्याची दणक्यात विक्री सुरू आहे. विक्रेत्यांना अभय दिले जात असल्याने गुटखा विक्री जोमात आणि अन्न औषध प्रशासन कोमात गेल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.
महाराष्ट्रात गुटखा विक्रीला बंदी आहे; परंतु रहिमतपूर येथे राजरोसपणे गुटखा विक्री सुरू आहे. बाहेरून रात्री-अपरात्री येणाऱ्या गाड्यांतून गुटखा रहिमतपुरातील चौकात पोहच होतो. गुटख्याच्या पुड्यांच्या माळा तरटाच्या पोत्यात खचाखच भरलेल्या असतात. रातोरात गुटख्याची पोती स्थानिक विक्रेते दुचाकी-चारचाकीतून घेऊन जातात. तसेच रहिमतपुरातील एका ठिकाणी याचा काहीसा साठा करून ठेवला जातो. हाच साठा काही दिवस परिसरातील गावोगावच्या विक्रेत्याकडे मागणीनुसार पोहोच केला जातो. रहिमतपुरातील रस्त्यावर तसेच ठिकठिकाणी गुटख्याच्या रिकाम्या पुड्या दिसून येतात. तर सार्वजनिक शौचालयासह अनेक ठिकाणचे कानेकोपरे गुटखा खाणाऱ्यांच्या पिचकाऱ्यांनी रंगलेले आहेत.
अन्न व औषध प्रशासनामार्फत गुटखा विक्रेत्यांवर कारवाई होणे गरजेचे आहे. मात्र अन्न प्रशासनाकडून कुठल्याही विक्रेत्यांवर गेल्या काही महिन्यांमध्ये कारवाई केल्याचे ऐकिवात नाही. तसेच पाेलिसांकडूनही गुटखा विक्रेत्यांवर कारवाई केल्याचे दिसून आले नाही. बेकायदा गुटख्याची विक्री सुरू असताना अन्न प्रशासन आणि पोलिस प्रशासन याकडे दुर्लक्ष का करतंय? असा प्रश्न अनेकाकडून उपस्थित केला जात आहे.
(चौकट)
गुटख्याची उपलब्धी मुबलक
जागोजागीच्या काही टपऱ्या आणि दुकानांमध्ये मिळणाऱ्या गुटख्यामुळे गुटख्याला नक्की बंदी आहे का? असा प्रश्न उपस्थित होतो. बंदी असलेली वस्तू सहजासहजी उपलब्ध होत नाहीत. परंतु गुटखा मुबलक प्रमाणात मिळत असल्याने बंदीबाबत शंका उपस्थित होऊ लागली आहे.