सातारा : शहापूर, ता. सातारा येथे पोलिसांनी तब्बल २० लाखांचा गुटखा जप्त केला असून, याप्रकरणी एका युवकाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास करण्यात आली.राहुल वामन माने (वय २९, रा. शहापूर, ता. सातारा) असे अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, शहापूर येथे टेम्पोमधून मोठ्या प्रमाणात गुटख्याची वाहतूक होणार असल्याची माहिती सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला कारवाईच्या सूचना दिल्या.
डीबी पथकातील हवालदार राजू मुलाणी, दादा परिहार, सुजीत भोसले, रमेश चव्हाण, संदीप कुंभार यांनी गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास तत्काळ शहापूरकडे धाव घेतली. त्यावेळी राहुल माने हा टेम्पोजवळ सापडला. त्याच्याकडे विचारपूस केल्यानंतर पोलिसांनी टेम्पोमध्ये पाहणी केली. त्यावेळी टेम्पोमध्ये १४ पोती आढळून आली. त्यामध्ये विविध कंपनीचा गुटख्याचा साठा सापडला.गुटखा बंदी असतानाही एवढ्या मोठ्या प्रमाणात राहुल मानेकडे गुटखा सापडल्याने खळबळ उडाली आहे. तो अनेक दिवसांपासून लपून-छपून गुटखा विकत असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. पोलिसांनी त्याचा टेम्पो (एमएच ११ ए. एल. ३६५३) जप्त केला आहे. याबाबत अन्न सुरक्षा अधिकारी अनिल पवार यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलीस उपनिरीक्षक वर्षा देसाई या अधिक तपास करत आहेत.