प्रगती जाधव-पाटील।सातारा : नागपूर येथील शिक्षिकेवर किंवा मुंबईत तरुणीवर झालेला अॅसिड हल्ला हा एकतर्फी प्रेमापेक्षाही नकार पचवू न शकलेल्या पुरुषाने महिलेवर केलेला हल्ला असंच म्हणावं लागेल. नकार ऐकण्याची आणि तो पचविण्याची क्षमता कमी होत असल्याने अॅसिड हल्ल्याचे विकृत प्रयोग होत आहेत. या पार्श्वभूमीवर साताऱ्यात गेल्या अनेक वर्षांपासून विवेकवाहिनी तरुणांना नकार पचविण्याचे प्रशिक्षण देत आहे.
साता-यातील विवेकवाहिनीच्या माध्यमातून तरुणाईला दोन दशकांपासून विविध स्तरांवर येणारे अपयश आणि नकार पचविण्यासाठी प्रशिक्षित दिले जात आहे. विवेक वाहिनीच्यावतीने जोडीदाराची विवेकी निवड या उपक्रमांतर्गत नकार पचविण्याचे शिकविले जाते. महिलांनाही नकार देण्याचा अधिकार आहे, त्यामुळे त्यांच्या मताचा सन्मान करायला शिका, असं वारंवार तरुणांच्या मनावर बिंबविले जात आहे.
भविष्यात हे हल्ले होऊ नयेत, यासाठी तरुणांबरोबरच तरुणींनाच सक्षम आणि स्पष्टपणे मत मांडण्यासाठी आग्रही राहण्याचे शिकविले पाहिजे. यासाठी हे प्रशिक्षण दिले जात असल्यामुळे कोणत्याही प्रकारच्या अनुचित घटना घडणार नाहीत. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
स्पष्ट नाही म्हणायला शिका !मोबाईल नंबर मिळवून त्याद्वारे चॅटिंग आणि पुढं डेटिंग हा तरुणाईचा फंडा होऊ पाहत आहे. मुळातच एखाद्याविषयी शंका असेल तर त्यांच्याशी संवाद टाळणं उत्तम; पण अनेकदा स्पष्टपणे नाही म्हणण्याचं धाडस होत नसल्यामुळे नात्यात गोंधळ सुरू होतो. तरुण प्रेमाच्या हिशेबाने बोलत असतो तर तरुणी मैत्रीच्या रुपात उत्तरे देत असती. एखाद्या प्रश्नाच्या किंवा मिळालेल्या उत्तराच्या बाबत काहीही शंका वाटली तर स्पष्टपणे त्यांचे निरसन होणे आवश्यक आहे. ते नाही झालं तर क्लिष्टता वाढत जाते. त्यामुळे तरुण-तरुणी दोघांनीही स्पष्ट नाही म्हणायला आणि नकार पचवायला शिकलं पाहिजे.
संयुक्त कुटुंबांचा फायदामोठ्या शहरांमध्ये न्युक्लिअर कुटुंब वास्तव्यास आहेत. त्यामुळे पालकांचा आणि पाल्यांचा संवाद अल्प झालाय. आधुनिक गॅझेटमुळं जग जवळ आणि माणसं दुरावली गेलीत. ही अवस्था छोट्या शहरांमध्ये दिसत नाही. परिणामी मनात येणाऱ्या भावनांविषयी स्पष्टपणे बोलायला हक्काचा चुलत, मावस, बहीण भाऊ असतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे बाहेर काहीही गडबडी करून आलेल्यांच्या चेहºयावरील हावभाव ओळखणारी पारखी नजर घराघरांमध्ये असते. आजी-आजोबांना काय केलं हे नाही कळत; पण काहीतरी झालंय ते तरी नक्कीच कळतं. महानगरांमध्ये ही पिकलेली पानं नसतात.
म्हणून साताऱ्यात प्रमाण कमीसातारा जिल्हा आकाराच्या आणि लोकसंख्या घनतेच्या मानाने आकाराने लहान असा जिल्हा आहे. इथं पावलोपावली कोणीतरी ओळखीचा, पाहुणा, मित्र असे भेटत राहतात. शहर व परिसराची हद्द अतिविस्तीर्ण नसल्यामुळे येथे प्राणघातक हल्ला करण्याला तरुणाई धजत नाही. उलटपक्षी अनैतिक संबंधांतून खून करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे; पण तरुणीवर प्राणघातक हल्ला करून तिचं विद्रुपीकरण करण्याचा प्रयत्न साता-यात झाला नाही.
महिलांना मालमत्ता समजायची आणि तिने नकार दिला तर तिला इजा पोहोचविण्याच्या मानसिकतेतून हे अॅसिड हल्ले होतात. विवेकवाहिनी विविध स्तरांवर तरुणांना याविषयी मार्गदर्शन करून ‘नकाराचा अर्थ नकारच असतो,’ हे तरुणांना समजावून सांगते. परिणामी मुलांमध्ये नकार पचविण्याची तयारी निर्माण होते.- डॉ. हमीद दाभोलकर, मानसोपचारतज्ज्ञ, सातारा