तेरावा झाला, श्राद्धही घातलं अन् एकेदिवशी अचानक तो घरी परतला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2020 10:29 AM2020-10-18T10:29:20+5:302020-10-18T10:30:02+5:30
सातारा येथील यशोधन निवारा आश्रम केंद्रात काही दिवसांपूर्वी दलालाच्या तावडीतून सुटका केलेल्या 4 मनोरुग्णांना आणण्यात आले होते. तेथे आश्रमाचे संचालक रवी बोडके यांनी त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली.
सातारा - घरातून निघून गेलेला नवरा अचानक 8 वर्षांनी परतला असून सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला. विशेष म्हणजे जी व्यक्ती मरण पावली असं समजून नातेवाईकांसमक्ष श्राद्ध घातलं, विधीही उरकले आणि ती व्यक्ती अचानक परतल्याने कुटुंबीय हरकून गेले. नवऱ्याने 8 वर्षांपूर्वी घर सोडले, तीन वर्षांची मुलगी, एक वर्षाचा मुलगा आणि पत्नीने नवरा आज येईल, उद्या येईल म्हणून वाटेकडे डोळे लावले होते. मात्र, नागतलगांच्यापुढे काहीच चालेना म्हणून तिने नवरा परत येण्याची आशाच सोडून दिली. अखेर, काहीतरी बरे-वाईट झाले असेल असे समजून नातलगांच्या सक्षीने मढे घाटावर तेराव्याचा विधी पार पडला. त्यानंतर वर्षाने श्राद्धही घातलं, अन् काही वर्षात तो पुन्हा परतला.
सातारा येथील यशोधन निवारा आश्रम केंद्रात काही दिवसांपूर्वी दलालाच्या तावडीतून सुटका केलेल्या 4 मनोरुग्णांना आणण्यात आले होते. तेथे आश्रमाचे संचालक रवी बोडके यांनी त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली. त्यातील साजन (नाव बदललं आहे) मात्र शांत होता. दोन दिवसांनंतर त्याला माहिती विचारण्यात आली, त्यावेळी त्याने पत्नी व मुलांची नावे सांगितली. तसेच, पालघर जिल्ह्यातील मनोर तालुक्यात कोसबांड हे आपलं गाव असल्याचंही त्याने सांगितलं. त्यामुळे, साजनला घरी सोडण्याचा निर्णय रवि बोडके यांनी घेतला.
बोडकेंनी ठरल्याप्रमाणे साजनला घेऊन कोसबांड गाव गाठले. त्यावेळी, गावच्या सरंपचांनी साजनला पाहून डोळेच विस्फारले. अरे.. तुझं तर बायकोनं श्राद्ध घातलं होत की, तू जिवंत कसा.. ? अस प्रश्न सहजच सरपंचांच्या तोंडातून बाहेर आला. त्यानंतर, सरपंचांसह साजनला घेऊन रवि बोडके साजनच्या घरी पोहोचले. त्यावेळी, घरात मुलगी अन् मुलगा होते. या सर्वांनी मुलीकडे पाहून तिला प्रश्न विचारला, ओळखलं का ?. मुलगी काही वेळ स्तब्ध झाली अन् तिने घरातील फोटोकडे पाहिले. त्यानंतर, बाबाssss म्हणत मुलीने मिठी मारली. मुलीच्या या मिठीनं साजनच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले अन् घरातील सर्वांनाच आनंद झाला.