सातारा जिल्ह्यातील 'हे' गाव बनले राज्यातील पहिले ‘गो ग्रीन व्हिलेज’
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2022 04:53 PM2022-03-22T16:53:05+5:302022-03-22T16:53:24+5:30
ढेबेवाडी : पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी आता राज्यातील पहिले ‘गो ग्रीन व्हिलेज’ ठरले आहे. गावातील वीजग्राहकांनी वीज बिले ईमेलद्वारे स्वीकारण्याचा ...
ढेबेवाडी : पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी आता राज्यातील पहिले ‘गो ग्रीन व्हिलेज’ ठरले आहे. गावातील वीजग्राहकांनी वीज बिले ईमेलद्वारे स्वीकारण्याचा उपक्रम राबविला आहे. बिलांच्या कागदासाठी होणारी वृक्षतोड रोखण्यासाठी मान्याचीवाडीने एक पाऊल पुढे टाकल्याने महावितरण कंपनीकडूनही गावकऱ्यांचे कौतुक होत आहे. यामुळे ग्राहकांनाही प्रत्येक बिलात सूट मिळणार आहे.
ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. वसुंधरा, जैवविविधता यांचे संवर्धन आणि संगोपन करीत वृक्षसंवर्धन करण्यासाठी गावात बैठक घेण्यात आली. यावेळी सरपंच रवींद्र माने यांनी गावकऱ्यांना पर्यावरणाचे महत्त्व पटवून दिले. त्यानुसार शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली.
यामध्ये वीज वितरण कंपनीने ग्राहकांच्या लाभाची आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी ‘गो ग्रीन’ योजना आणल्याचे गावकऱ्यांना सांगून त्यामुळे ग्राहकांना होणारा लाभ आणि बिलासाठी लागणाऱ्या कागदाची होणारी बचत याबाबत लोकांमध्ये जागृती केली. त्यानुसार गावातील १२० वीजग्राहकांनी पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार घेत एकमुखी संपूर्ण गावच गो ग्रीन करण्यावर शिक्कामोर्तब केले.
ग्रामपंचायतीच्या सेवा सरकार केंद्रामध्ये सर्व वीजग्राहकांची गो ग्रीन योजनेसाठी ऑनलाइन नोंदणी केली. प्रत्येक ग्राहकाच्या बिलासाठी ग्रामपंचायतीचा मेलआयडी देण्यात आला. गावातील सर्वच्या सर्व १२० ग्राहकांनी या योजनेत सहभाग नोंदविला. त्यामुळे मान्याचीवाडी गाव योजनेत शंभर टक्के नोंदणी केलेले राज्यातील पहिले ‘गो ग्रीन व्हिलेज’ ठरले आहे. यासाठी वीज कंपनीचे कार्यकारी अभियंता आर. एस. बुंदेले, उप अभियंता ए. ए. आदमाने, शाखा अभियंता डी. एम. शेडे यांचे मार्गदर्शन लाभले.
राज्यात सुमारे अठ्ठावीस लाख ग्रामपंचायतींमध्ये कोट्यवधी वीजग्राहक आहेत. वीज बिले छपाईसाठी दरमहा हजारो टन पेपर लागतो. यासाठी मोठी वृक्षतोड होते. यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो. यावर ग्राहकांनीच निर्बंध घातले तर पर्यावरण संवर्धन तर होईलच; पण ग्राहकांनाही लाभ मिळेल. यासाठी प्रबोधन गरजेचे आहे. - रवींद्र माने, सरपंच मान्याचीवाडी